Pakistani Actresses Trolled: १४ ऑगस्ट २०२६ रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन होता. स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन करतानाचा काही पाकिस्तानी अभिनेत्रींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पाकिस्तानी ध्वज हातात धरून स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिसत आहेत, पण बॅकग्राउंडला ‘ए वतन मेरे वतन’ हे गाणं वाजतंय. विशेष म्हणजे हे गाणं आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या ‘राझी’ चित्रपटातील आहे.

पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर द्रेजाझ वारिस याने एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रींच्या गाण्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला. या अभिनेत्री शोबिझमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी यासंदर्भात जास्त काळजी घ्यायला हवी होती. तसेच या व्हिडीओमुळे भारतीय युझर्सना त्यांची खिल्ली उडवण्याची संधी मिळाली आहे, असंही त्याने नमूद केलं.

व्हिडीओमध्ये द्रेजाझ म्हणाला, “हे गाणं पाकिस्तानविरोधी चित्रपटातलं आहे. त्यामुळे तुम्ही असं करायला नको होतं. तुम्ही एवढ्या सिनियर अभिनेत्री आहात, तुम्हाला याचं भान असायला हवं. तुम्हाला काय झालंय? अशा गोष्टींमुळे आपली खिल्ली उडवली जाते. भारतीय लोकसुद्धा आपली खिल्ली उडवतात. मी भारतीय व्लॉगर्सच्या रील्स पाहिल्या, ते या व्हिडीओवरून आपली थट्टा करत आहेत.”

द्रेजाझचा वारिसचा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक लोक अभिनेत्रींना फॉलो करतात, त्यामुळे त्यांनी काय पोस्ट करतोय, याबद्दल काळजी घ्यायला हवी, असंही द्रेजाझ म्हणाला. “हे खरंच योग्य आहे का? काही पाकिस्तानी अभिनेत्री आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन भारतीय देशभक्तीपर गाणं लावतात, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो. हा बॉलीवूड किंवा भारतीय संगीताला विरोध करण्याचा मुद्दा नाही. पण काही प्रसंगांना राष्ट्रीय महत्त्व असते आणि तिथे सांस्कृतिक संवेदनशीलता दाखवणं गरजेचं असतं. याउलट परिस्थिती आहे, अशी कल्पना करा; तर तिथेही अशीच टीका झाली असती. स्वातंत्र्यदिनाची स्वतःची एक ओळख, भावना आणि देशभक्तीपर संगीत असते. त्यामुळे त्यानुसार गाणं निवडणं ही काही फार मोठी अपेक्षा नाही,” असं मत द्रेजाझने व्यक्त केलं.

पाकिस्तानी अभिनेत्रींच्या व्हिडीओबद्दल नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या पोस्टवर सोशल मीडिया युझर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युझर्सनी द्रेजाझचा मुद्दा रास्त असल्याचं म्हटलंय. तर काहींच्या मते दुसऱ्या देशातील देशभक्तीपर गाणं वापरण्यात काहीही चुकीचं नाही.

एका युजरने लिहिलं, “वतनचं गाणं हे कोणत्याही वतनसाठी (देशासाठी) असू शकते.” तर दुसऱ्याने कमेंट केली, “त्यात काय झालं सर.. कलेला कोणतीही सीमा नसते, ना धर्म ना देश.. भावना महत्त्वाची असते.” “हे प्रेम आहे सर, त्यांचे भारतावरील प्रेम,” असं एका युजरने लिहिलं. पुढे एक युजर म्हणाला, “भारत-पाकिस्तानमधील मतभेद फक्त सैन्य आणि दहशतवाद्यांपुरते आहेत. बाकी दोन्ही देशांतील सामान्य नागरिक परदेशात खूप मैत्रीपूर्ण राहतात. आपल्यात फार काही फरक नाही, त्यामुळे एवढं चालतं.” तर “काही हरकत नाही, भारतीयांचं मन खूप मोठं आहे,” असं एकाने लिहिलं. “पाकिस्तानमधील एवढी गाणी आहेत, पण यांना व्हायरल व्हायचं होतं,” अशा प्रकारच्या कमेंट्स या गाण्यावर आहेत.

pakistani-actresses-trolled-using-indian-patriotic-song-raazi
व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (फोटो- इन्स्टाग्राम स्क्रीनशॉट)

राझी चित्रपटाची कथा

दरम्यान, ‘राझी’ हा २०१८ मध्ये आलेला एक हेरगिरीवर आधारित चित्रपट आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, विकी कौशल, रजित कपूर, शिशिर शर्मा आणि जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात आलिया भट्ट एक रॉ एजंट असते. ती वडिलांच्या सांगण्यावरून १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीत लष्करी संबंध असलेल्या एका पाकिस्तानी कुटुंबात लग्न करते आणि भारताला गुप्त माहिती पुरवते.