‘धूम-३’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘रामलीला’,  ‘आशिकी-२’ या चित्रपटांनी पाकिस्तानात घवघवीत यश मिळवल्यानंतर बॉलीवूडच्या या यशाचा मत्सर करण्यास पाकिस्तानी दिग्दर्शकांनी सुरुवात केली आहे. हिंदी चित्रपटांवर या देशात बंदी आणण्यासाठी काही पाकिस्तानी दिग्दर्शक सरसावले असून, त्यांनी तसे प्रयत्न करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र हिंदी चित्रपटांच्या यशात खोडा घालणाऱ्या या पाकिस्तानी दिग्दर्शकांबाबत तेथील चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारत-पाकिस्तान युद्धानंतर म्हणजेच १९६५पासून पाकिस्तानात भारतीय चित्रपटांना बंदी घालण्यात आली होती. परवेज मुशर्रफ यांनी २००६मध्ये ही बंदी उठवल्यानंतर हिंदी चित्रपटांनी या देशात तिकीटबारीवर मोठे यश मिळवले. गेल्या वर्षभरात तब्बल ६० चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झालेत. आमिर खानच्या ‘धूम-३’ या चित्रपटाला तर पाकिस्तानी प्रेक्षकांनी उचलून धरले असून, या चित्रपटाने तिथे चांगलाच गल्ला जमवला आहे. त्यामुळे तेथील चित्रपटगृहांचे मालकही बॉलीवूड चित्रपटांची जोरदार मागणी करत आहेत. ‘‘लाहोरमध्ये हिंदी चित्रपट नेहमीच चालतात. आता माझ्याच चित्रपटगृहात धूम-३चे दररोज चार खेळ प्रदर्शित होतात. प्रेक्षकही या चित्रपटाला मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत,’’ अशी माहिती लाहोरमधील एका चित्रपटगृहाचे मालक असलेल्या रमजान शेख यांनी दिली.
बॉलीवूड चित्रपटांच्या या यशाला स्थानिक दिग्दर्शकांनी आक्षेप घेतला आहे. हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे स्थानिक चित्रपटांना अपयश येत आहे, त्यामुळे हिंदी चित्रपटांवर बंदी आणण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत, अशी भूमिका तेथील दिग्दर्शकांनी घेतली आहे. पाकिस्तानी दिग्दर्शक सय्यद नूर यांनी तर बॉलीवूड चित्रपटांविरोधात जोरदार मोहीमच सुरू केली आहे. ‘‘बॉलीवूड चित्रपट मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च करून तयार केलेले असतात. त्यांच्याशी पाकिस्तानी चित्रपट स्पर्धा करू शकत नाहीत. मात्र त्यांच्या प्रदर्शनामुळे स्थानिक चित्रपटसृष्टी मृत होईल, अशी भीती वाटते,’’ असे नूर यांनी सांगितले. ‘‘माझा भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनाला विरोध नाही. मात्र राष्ट्रीय चित्रपट वाचवणेही महत्त्वाचे आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
सर्वच चित्रपटगृहांमध्ये जर बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होत असतील, तर पाकिस्तानी चित्रपटांचे प्रदर्शनच होणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी चित्रपटांना काही प्रमाणात आरक्षण द्यावे. निम्म्या तरी चित्रपटगृहांमध्ये पाकिस्तानी चित्रपटच प्रदर्शित करण्यात यावेत, असे नूर यांनी सांगितले.
‘धूम-३’चा दोन कोटींचा गल्ला
पाकिस्तानात तब्बल ५६ चित्रपटगृहांमध्ये ‘धूम-३’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल दोन कोटींचा गल्ला जमवला. पाकिस्तानी चित्रपट ‘वार’पेक्षा ‘धूम-३’ने दुप्पट रक्कम कमावली आहे. ‘रामलीला’, ‘आशिकी-२’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटांनीही पाकिस्तानी तिकीट बारीवर घवघवीत यश मिळवले आहे.