दोन महिन्यांपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या थाटामाटात प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. १ मार्च ते ३ मार्च अशा तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राजकीय नेते, उद्योजक, हॉलीवूड-बॉलीवूड सेलिब्रिटी अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. तीन दिवसांच्या या सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा फक्त देशातच नव्हे तर जगभरात होती. अशा या भव्यदिव्य सोहळा पाकिस्तानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रिक्रिएट केला होता; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. तीन दिवसांच्या या सोहळ्यातील खास क्षण पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी रिक्रिएट केले आहेत.

हेही वाचा – “निवांत अर्धा तास गप्पा अन्…”, Cannes निमित्ताने छाया कदम यांची ए.आर. रेहमान यांच्याशी झाली खास भेट, फोटो शेअर करत म्हणाल्या…

व्हिडीओ क्रिएटर नूर ताहिरच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्री-वेडिंग सोहळ्यातील अनंत-राधिका, इशा अंबानी, नीता अंबानी, शाहरुख खान, दिलजित दोसांझ, करीना कपूर, रिहाना, ओरी यांच्यासारखी हुबेहूब वेशभूषा करून पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी नक्कल केली आहे. रिहानाचा परफॉर्मन्स, सलमान, शाहरुख, आमिर खान यांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील डान्स, राधिका मर्चंटची एन्ट्री असे खास क्षण पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी रिक्रिएट केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी १००० कोटींचा अनंत-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा १००० रुपयांच्या बजेटमध्ये रिक्रिएट केला आहे. सध्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: मतदान करायला गेलेल्या रणबीर कपूरच्या ‘त्या’ कृतीने चाहत्यांची जिंकली मनं, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत २३.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. १.१ मिलियन लाइक्स असून प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. ओरीसह अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.