‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पाडलेला स्पर्धक पराग कान्हेरे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. फेसबूक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पराग बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडींवर मतं व्यक्त करत असतो. नुकत्याच पार पडलेल्या ‘तिकीट टू फिनाले’ या टास्कवर परागने संताप व्यक्त केला. किमान लाजेखातर तरी प्रेक्षकांना या खेळात सहभागी करून घ्या, अशा शब्दांत त्याने बिग बॉसवर ताशेरे ओढले.

बिग बॉसच्या घरात मंगळवारी जुने सदस्य पुन्हा आले होते. या जुन्या सदस्यांना बिग बॉसने कार्य सोपवले होते. त्यामध्ये या सदस्यांनी त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम असणाऱ्या दोन सदस्यांची नावे बिग बॉसकडे सुपूर्द करायची होती. नऊपैकी आठ मते मिळवणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला फिनालेमध्ये जागा मिळणार होती. घरातील जुन्या सदस्यांनी मतदान केल्यानंतर नेहा शितोळेला आठ मते मिळाली. तर, शिवानी सुर्वेला पाच मते मिळाली. त्यामुळे या दोघीजणी अंतिम फेरीत दाखल झाली असल्याची घोषणा बिग बॉसने केली. याच नॉमिनेशन प्रक्रियेवर परागने आक्षेप घेतला.

आणखी वाचा : KBCच्या पहिल्या करोडपतीचं १९ वर्षांत असं बदललं आयुष्य; रातोरात बनला होता स्टार

इन्स्टाग्रामवर त्याने पोस्ट लिहिली की, ‘माझा बॉल, माझी बॅट, माझा स्टंप.. किमान थर्ड अंपायर म्हणून तरी प्रेक्षकांना खेळात सहभागी होऊ द्या (लाजेखातर).’ या मूर्खपणात मी सहभागी नसल्याचा मला आनंद आहे, असं त्याने म्हटलं.

‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नेहा आणि शिवानीने फिनालेमध्ये जागा पक्की केल्यानंतर आता आणखी कोण अंतिम फेरीत पोहोचणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.