Bigg Boss Marathi 2: ‘आता सगळ्यांचा हिशोब होणार’; पराग कान्हेरे परतणार?

वीणाला लाथ मारणारी शिवानी घरात परत येऊ शकते तर मी का नाही, असा प्रश्न परागने उपस्थित केला आहे.

parag kanhere
पराग कान्हेरे

गेल्या आठवड्याभरापासून बिग बॉसच्या घरात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. शिवानी सुर्वे घरात परतली आणि वाद पुन्हा एकदा सुरू झाले. आता घरातला आणखी एक वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेला स्पर्धक परतण्याची शक्यता आहे. शेफ पराग कान्हेरेनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भातली पोस्ट लिहिली आहे.

‘येतोय मी. आता सगळ्यांचा हिशोब होणार. तू, तो आणि ती पण जाणार,’ असं परागने फेसबुकवर लिहिलं आहे. त्यामुळे शिवानीपाठोपाठ परागसुद्धा बिग बॉसच्या घरात परतण्याची चर्चा होत आहे. शिवानी घरात काही दिवस पाहुणी म्हणून आली आहे हे बिग बॉसने तिला सांगितलं. त्यामुळे पराग स्पर्धक म्हणून येणार की शिवानीसारखा पाहुणा म्हणून, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिेलेल्या मुलाखतीत पराग या पोस्टबद्दल म्हणाला, ‘मला बिग बॉसच्या घरात परत जाण्याविषयी ठाऊक नाही पण शोमध्ये परतण्याची माझी खरंच इच्छा आहे. यासाठी मी गोव्याला गेलो नाही. माझी कामंसुद्धा मी पुढे ढकलली आहेत.’ यावेळी याने शिवानी सुर्वेच्या एण्ट्रीवरही प्रश्न उपस्थित केले. शिवानीने वीणा जगतापला लाथ मारली होती. तिने बिग बॉसवरही कारवाई करण्याची धमकी दिली होती. जर ती घरात पुन्हा जाऊ शकते तर मी का नाही, असा सवाल त्याने केला आहे. त्याचप्रमाणे अभिजीत बिचुकलेसंदर्भातही त्याने सारखाच प्रश्न उपस्थित केला. ‘अभिजीतचे बॅग अजूनही बिग बॉसच्या घरात आहेत. त्याच्या नावाची प्लेटसुद्धा आहे. ज्या व्यक्तीवर दोन गुन्ह्यांचे आरोप आहेत, असा व्यक्ती अजूनही शोचा भाग असू शकतो तर मी का नाही,’ असं पराग म्हणाला.

नेहा शितोळेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर परागला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पराग घरातून गेल्यानंतर सोशल मीडियावर त्याला परत आणण्याची चर्चा सुरू झाली होती. ‘BringBackParag’ हा हॅशटॅगसुद्धा ट्विटरवर ट्रेण्ड होत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parag kanhere returning to bigg boss marathi 2 ssv