सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेमुळे सर्वजण थक्क झाले आहेत. या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात हात उचलला. त्यानंतर या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी याबाबत भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परेश रावल यांनी काही तासांपूर्वी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आजकाल कॉमेडियन हे सर्वत्र धोक्यात आले आहेत. मग तो क्रिस असो किंवा झेलेन्स्की!!!’ असे ट्विट परेश रावल यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा उल्लेख करण्याचे कारणही खास आहे. झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी विनोदी अभिनेते होते. ते प्रचंड प्रसिद्ध होते. गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रशियन युद्धाशी झुंज देत आहेत. यामुळेच परेश रावल यांनी झेलेन्स्की आणि कॉमेडियन क्रिस रॉक यांचे नाव घेतले आहे.

Video: विल स्मिथनेही भर कार्यक्रमात उडवली होती टक्कल पडलेल्या व्यक्तीची खिल्ली, नेटकऱ्यांनी दिला पुरावा

परेश रावल यांच्या या ट्विटनंतर ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

“मी चुकीचा होतो, मला…”; क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे यावर भाष्य केले होते. “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील मी केलेले वर्तन हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझी मस्करी करणं किंवा माझ्या कामाची खिल्ली उडवणं ठीक होतं पण जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवल्यानंतर सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.” असे विल स्मिथने म्हटले.

“क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित असलेल्या व्यक्तींची आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या किंग रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग लागला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असेही विल स्मिथ म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paresh rawal react on will smith slapped chris rock says comedians in danger everywhere nrp
First published on: 31-03-2022 at 14:29 IST