Paresh Rawal Watch Amruta Subhash Natak : मराठी नाटकांची एक मोठी परंपरा आहे. मोठा प्रेक्षकवर्ग मराठी नाटकांचा चाहता आहे. सामान्य प्रेक्षकांबरोबरच बॉलीवूडचे काही कलाकारसुद्धा मराठी नाटकांचे चाहते आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे परेश रावल.
परेश रावल हे मराठी नाटकांचे खूप मोठे चाहते आहेत. विविध मुलाखतींमधून त्यांनी मराठी नाटकांवरील त्यांचं प्रेम व्यक्तसुद्धा केलं आहे. आजवर अनेक मराठी नाटकं त्यांनी पाहिली आहेत. तसेच ही नाटकं प्रेक्षकांना बघण्यासाठीसुद्धा सांगितलं आहे. अशातच त्यांनी अमृता सुभाषच्या ‘असेन मी नसेन मी’ नाटकाला हजेरी लावली.
मराठी नाटकाला परेश रावल यांची उपस्थिती
अमृता सुभाष, शुभांगी गोखले व नीना कुळकर्णी यांचे रंगभूमीवर ‘असेन मी नसेन मी’ नाटक सुरू आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे नाटक बघण्याचा मोह परेश रावल यांनासुद्धा आवरता आला नाही. परेश रावल यांच्यासह अभिनेत्री विद्या बालनसुद्धा आई आणि बहिणीसह हे नाटक बघण्यासाठी गेली होती. त्याबद्दलची एक पोस्ट अमृताने शेअर केली आहे.
अमृता सुभाषने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय, “कितीतरी दिग्गज माणसं आवर्जून आमच्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला आली. मन आनंदानं भरून गेलं आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते परेशजी रावल आले. ते अनेक मराठी नाटकांना उपस्थित राहतात आणि मराठी रंगभूमीवर त्यांचं मनापासून प्रेम आहे हे क्षणोक्षणी जाणवत राहतं. विद्या बालन ही एक अप्रतिम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक फार अनमोल माणूस आहे. ‘गल्ली बॅाय’ पाहून तिनं आपणहून झोया अख्तरकडून माझा नंबर मिळवून मला मेसेज केला. ‘पुनश्च हनिमून’चं हिंदीतलं ‘फिरसे हनिमून’ हे नाटक पाहायला ती दोनदा आली. ‘असेन मी नसेन मी’ मराठी असलं तरी ते नाटक आई, मुलगी आणि दोन बहिणींची गोष्ट आहे, असं तिला कळल्यावर ती तिची बहीण, बहिणीचा नवरा (जो मराठी आहे) आणि आई या सगळ्यांना आवर्जून घेऊन आली. लव यू विद्या”
पुढे अमृता म्हणाली, “‘डीअर जिंदगी’ या चित्रपटाची आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे आली आणि तिच्यासारख्या माझ्या आवडत्या दिग्दर्शिकेनं माझं पहिलंवहिलं दिग्दर्शन असलेलं नाटक पाहिलं याचा मला विशेष आनंद झाला. माझी ‘चोक्ड’ या चित्रपटातली आणि संदेशची ‘घुमर’ या चित्रपटातली सहकलाकार संयमी खेरपण आवर्जून आली. आमचा लेखक मित्र निरंजन अय्यंगार आणि नृत्यदिग्दर्शक मित्र भाव हे तर दुसऱ्यांदा नाटकाला आले होते. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपेपण आल्या होत्या. मन भरून गेलं आहे. आमच्या नाटकाच्या संपूर्ण टीमतर्फे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.”
अमृता सुभाषने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट
अमृताने शेअर केलेल्या या पोस्टवर जितेंद्र जोशी, मयूरी देशमुख, फुलवा खामकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनीसुद्धा या पोस्टवर कमेंट्स करीत अमृताचे हे नाटक, कलाकारांबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

