scorecardresearch

काठावर पास..

तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या राजकारण्याला आपण शिक्षणात कमी पडलो आणि आता आयुष्यात पुढे जायचे असेल तर किमान दहावीची परीक्षा पास करायला हवी, असा साक्षात्कार होतो.

रेश्मा राईकवार

तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या राजकारण्याला आपण शिक्षणात कमी पडलो आणि आता आयुष्यात पुढे जायचे असेल तर किमान दहावीची परीक्षा पास करायला हवी, असा साक्षात्कार होतो. ही कल्पनाच मुळी भन्नाट आहे. याची गोष्ट सांगताना कल्पनेचे किती इमले चढवायचे आणि त्यातून वास्तवाचं भान कसं आणून द्यायचं हे दिग्दर्शकाचं खरं कसब. कल्पनाच मुळी विनोदी असल्याने ती गोष्टीत उतरताना विनोदी अंगाने त्याहीपेक्षा उपहासात्मक शैलीत उतरणार यात शंका नाही. मात्र उपहासातून कान टोचण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि मेहनतच ‘पर्याय’ म्हणून बाजूला टाकली असेल तर गोष्टीची उत्तरपत्रिका बिघडणारच.. त्यातल्या त्यात कलाकारांनी मनावर घेतल्याने ‘दसवी’ नापास होण्यापासून वाचला आहे असंच म्हणावं लागेल.

उत्तर प्रदेशची पार्श्वभूमी कथेला आहे. हरयाणा आणि उत्तर प्रदेश याच्या मध्ये कुठल्या तरी हरित प्रदेश नामक काल्पनिक प्रदेशात चित्रपट घडतो. या प्रदेशाचा मुख्यमंत्री दिलदार आहे. शिक्षण आणि लोकसेवेची चाड या दोन्ही गोष्टी सोडून राजकारणी होण्याचे सगळे गुण-दोष पुरेपूर ठासून भरलेले मुख्यमंत्री गंगाराम चौधरी यांची शिक्षकभरतीत घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात गच्छंती होते. तुरुंगात राजकारण्यांच्या सेवेस तत्पर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कृपेने पंचतारांकित हॉटेलमध्येही मिळणार नाहीत, अशा सोयीसुविधांनी युक्त तुरुंगातील (?) एका खोलीत गंगारामची व्यवस्था होते आणि मग तुरुंगातून सत्ताकारणाची सूत्रं हलवली जातात. आता बाहेर पडू.. म्हणणाऱ्या गंगारामचा तुरुंगातला काळ आणखी वाढतो. त्या दरम्यान सत्ता वाचवण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं तो पत्नी विमलकडे सोपवतो. एकीकडे बायको सत्ताकारण सांभाळत असताना तुरुंगात आरामात पडून असलेल्या गंगारामला दुसरा मोठा धक्का बसतो. तुरुंगाधिकारी म्हणून नव्याने नियुक्त झालेली ज्योती देस्वाल गंगारामच्या या आरामी वास्तव्याला सुरुंग लावते. त्याला खरोखर कैद्याप्रमाणे वागण्यास भाग पाडते. हा छळ सहन करत असतानाच त्याच्या आयुष्यात ‘शिक्षा’ नावाचा शब्द वेगळय़ा अर्थासह नव्याने दाखल होतो. आठवी पास झालेला गंगाराम दहावीची परीक्षा कशी देतो? तो खरंच पास होतो का? शिक्षणामुळे त्याच्या आयुष्यात खरंच बदल होतो? अशा कित्येक प्रश्नांची विनोदी ढंगात उत्तरं देणारा चित्रपट म्हणजे तुषार जलोटा दिग्दर्शित ‘दसवी’.

या चित्रपटाची कथा वास्तव घटनेवरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. ही घटना खरी असो वा खोटी.. ज्या पद्धतीने चित्रपटात ही गोष्ट रंगवण्यात आली आहे ती निखळ मनोरंजन करणारी आहे. त्यापलीकडे गोष्टीचं सार हवं तितक्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. रितेश शाह, सुरेश नायर आणि संदीप लैझेल या तीन लेखकांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. मात्र ही लिहीत असताना केवळ मनोरंजन करायचे की खरंच काही गांभीर्याने पोहोचवायचे यावर मुळात लेखकांमध्येच एकवाक्यता झालेली दिसत नाही. त्यामुळे सातत्याने ‘तारे जमीं पर’चा उल्लेख करणाऱ्या या चित्रपटातील अनेक गोष्टी अनेक चित्रपटांतून पाहिल्यासारख्या जाणवतात. ‘तारें जमीं पर’मधला डिसलेक्सिया हा प्रकार किंवा गंगारामला त्याच्या पद्धतीने शिक्षण देणारी तुरुंगात जमवलेली मंडळी पाहिली की एकाच वेळी मुन्नाभाई आणि ‘थ्री इडियट्स’मधल्या रँचोची आठवण होते. अर्थात ही सगळी जमवाजमव विनोद निर्माण करण्यासाठी योग्य आहे, पण खरोखरच अशा पद्धतीने गंगारामसारखा आठवी शिकलेला माणूस सहज शिक्षण घेऊन दहावीची परीक्षा पास होतो हे वास्तवापेक्षा परीकथेत शोभावे असे आहे. हा मुख्य पोकळ धागा सोडला तर काही बऱ्याचशा गोष्टी जमून आल्या आहेत आणि काही जमलेल्या गोष्टींचाही लेखक- दिग्दर्शकांनी स्वत:च जीव संपवला आहे. सध्याच्या राजकीय घटना लक्षात घेऊन केलेले संवाद हे चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणता येईल. अगदी सुरुवातीला आपण किती फिट आहोत हे जनतेला दाखवण्यासाठी गंगारामची सुरू असलेली धडपड आणि त्या अनुषंगाने आलेला ‘फिट इंडिया, हिट इंडिया, सो जाओ इंडिया, जाग जाओ इंडिया सब टाइमपास है’ किंवा गंगारामच्या सचिवाच्या तोंडी असलेला ‘जरूरी नही है राजनीती समजनेवाला दसवी पास करने की समज रखे’सारखा संवाद. चुरचुरीत आणि थेट काही सांगू पाहणारे असे कित्येक संवाद चित्रपटात पेरलेले आहेत. मात्र या संवादांमध्ये दडलेला जो अर्थ आहे तो मूळ कथेतही तितक्याच प्रभावीपणे उलगडता आला असता तर चित्रपटाची गुणवत्ता नक्कीच वाढली असती.

चित्रपटातील व्यक्तिरेखा विशेषत: गंगारामच्या आयुष्यात आलेल्या दोन स्त्रियांच्या व्यक्तिरेखा कागदावर सक्षम असल्या तरी कथेच्या ओघात त्यांना पुन्हा एकदा दुय्यम स्थान दिले गेले आहे. गंगारामची पत्नी विमल अचानक आलेल्या मुख्यमंत्रीपदामुळे गांगरून जाते. मात्र एकदा या पदाची खरी सूत्रं हातात आल्यावर ती अंतर्बाह्य बदलते. खुर्चीचा उपयोग कसा आणि कुठे करून घ्यायचा हे कळलेल्या विमलचा आणि त्याउलट तुरुंगातून वास्तवाचे भान घेऊन आलेल्या गंगारामचा संघर्ष हाही कथेला अधिक समर्थ करू शकला असता. मात्र एकीकडे विमल खलनायिका होते आणि पुन्हा नवऱ्याच्या समजदारपणामुळे तिचे सारे गुन्हे माफ होतात. तर दुसरीकडे कडक तुरुंगाधिकारी असलेली ज्योती देस्वालही गंगारामच्या बदलण्याच्या प्रयत्नांवर खूश होते, त्याला अभ्यासात मदत करते. खरं तर या दोन हुशार बायकांच्या कचाटय़ात सापडलेला गंगाराम असाही एक टप्पा चित्रपटात आहे, पण तोही दहावीची परीक्षा देण्यात वाया गेला आहे. चित्रपट विनाकारण फिरून फिरून गंगारामचा दहावीचा अभ्यास आणि परीक्षेभोवतीच घोटाळत राहतो. शिक्षणातून येणारं शहाणपण माणसाला घडवू शकतं हे भाषणातून सांगण्यापलीकडे हा सो स्मार्ट मुख्यमंत्री पोहोचत नाही. त्यातल्या त्यात अभिषेक बच्चन, निम्रत कौर आणि यामी गौतम या तीन मुख्य कलाकारांनी चित्रपटाची नौका त्यांच्या अभिनयावर उत्तम तारली आहे. अभिषेकला या भूमिकेत पाहणं ही पर्वणी आहे, मात्र ही त्याची सर्वोत्तम भूमिका आहे असं म्हणणं धाष्टर्याचं ठरेल. निम्रत कौरने बिम्मो ते मुख्यमंत्री विमला देवी हा बदलता सूर उत्तम टिपला आहे. यामीनेही कडक ज्योतीची भूमिका उत्तम साकारली असली तरी लेखनातच भूमिकेला मर्यादित केलं असल्याने तिच्या व्यक्तिरेखेचा मर्यादित प्रभाव पडतो. बाकी सगळेच छोटय़ा-मोठय़ा भूमिकेतील कलाकार उत्तम असले तरी अतिशय गोड – गोड पद्धतीची मांडणी आणि अभिनय यामुळे ‘दसवी’ पास करण्याचा हा प्रकार फारसा खरा वाटत नाही. तो केवळ रंजक अनुभव देतो इतकंच..

दसवी

दिग्दर्शक – तुषार जलोटा

कलाकार – अभिषेक बच्चन, निम्रत कौर, यामी गौतम, मनू रिषी, अरुण खुशवाह, दानिश हुसैन, चित्तरंजन त्रिपाठी, सचिन श्रॉफ

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pass punishment prison politician education life next tenth examination pass ysh

ताज्या बातम्या