सुशांत सिंह राजपूत हिंदी टेलिव्हिजन व बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता होता. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याने स्वबळावर इंडस्ट्रीत त्याची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे त्याच्या निधनाने अनेकांना धक्का बसला होता. आजही तो अनेकांच्या चर्चेचा विषय असतो आणि अनेक जण त्याची आठवण काढताना दिसतात. अशातच आता ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेते पंकज विष्णू यांनी त्याच्याबद्दल भाष्य केलं आहे.

पंकज विष्णू मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आतापर्यंत त्यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘पवित्र रिश्ता’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनया प्रवासाबद्दल सांगितलं आहे. यावेवळी त्यांनी ‘पवित्र रिश्ता’मधील त्यांचा सहकलाकार दिवंगत सुशांत सिंह राजपूतबद्दलही सांगितलं आहे.

सुशांतबद्दल पंकज विष्णू यांची प्रतिक्रिया

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पंकज विष्णू यांना त्याच्याबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “अतिशय मेहनती आणि हुशार मुलगा होता. त्यात आम्ही दोघेही इंजिनीअर असल्याने त्याबद्दल आमचं खूप बोलणं व्हायचं, ती गोष्ट आमच्यामध्ये सारखीच होती. आम्ही जवळपास पावणे दोन वर्षे एकत्र काम केलं आणि तो खूप आत्मविश्वास असलेला आणि शांत मुलगा होता. त्याला माहीत होतं की तो खूप पुढे जाणार होता आणि त्याकरता तो खूप मेहनतही करायचा.”

सुशांतबद्दल पंकज विष्णू पुढे म्हणाले, “तुम्हाला विश्वास बसणार नाही पवित्र रिश्ताच्यावेळी तो नच बलिये नावाचा शोही करायचा, अजूनही काहीतरी करत होता. असं तो २४ तास काहीतरी करतच असायचा. आम्ही त्याला सांगायचो की तू थोडा आराम कर खूप धावपळ करतोस. तो सकाळी सहा वाजता जुहू बीचला अॅक्शन स्टंट शिकण्यासाठी जायचा. त्यानंतर नच बलियेच्या रिहर्सलला जायचा, मग पवित्र रिश्ताच्या सेटवर यायचा त्यानंतर रात्री पुन्हा डान्स शोचं शूटिंग. तो भयंकर मेहनती मुलगा होता, सतत काम करायचा. त्याच्या रूममध्ये गेलं की काही डॉक्युमेंट्री पाहत असायचा, फिल्म मेकिंगची पुस्तकं वाचायचा. सतत नव नवीन गोष्टी शिकायचा लोकांनाही त्याचं कौतुक वाटायचं की कोणाचाही पाठिंबा नसातना त्याने इतकं यश मिळवलं.”

फिल्म स्टार बनण्यासाठी घेतलेला मोठा निर्णय

पुढे ते म्हणाले, “बिहारमधून, दिल्लीतून आलेला मुलगा त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळवलं, मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. त्यामुळेही लोक त्याचं कौतुक करतात की तो त्याच्या कलेच्या जोरावर पुढे गेला आणि त्याच्याबरोबर हे असं घडलं.” पुढे सुशांतने काम केलेले चित्रपटही तितकेच हिट झाले याबद्दल विचारल्यानंतर पंकज विष्णू म्हणाले, “त्याने ते जाणीवपूर्वक केलं होतं. त्याने मला सांगितलेलं की तो म्हणालेला मला काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे की तू ना टिव्हीची इमेज पुसण्यासाठी काही दिवस गायब हो. दिसेनासा हो, थोडे दिवस काहीच करू नकोस म्हणजे टिव्ही स्टार नसून फिल्म स्टारचा टॅग तुला मिळेल. म्हणून तो दीड वर्षे थांबला त्यानंतर त्याला चित्रपट मिळाला त्यानंतर त्याच्यावर त्याने खूप मेहनत घेतली. तेव्हा खूप आनंद झाला. त्याच्या सुदैवाने ती फिल्म हिट झाली. त्यानंतर पिके मिळाला, मग एम एस धोनी चित्रपट केला. त्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्यामुळे त्याच्या मालिका तर हिट झाल्याच पण चित्रपटही हिट झाले.”

सुशांतबद्दल पंकज विष्णू पुढे म्हणाले, “त्यामुळेच त्याचं लोकांना कौतुक वाटतं की तो इतका यशस्वी झाला. तो काही हृतिक रोशनसारखा खूपच देखणा होता असं काही नव्हतं, सामान्य मुलांप्रमाणेच दिसायचा पण छान दिसायचा. त्यामुळे लोकांना तो आपल्यातला आहे असं वाटायचं आणि त्याच्याबरोबर असं घडल्याने लोकांना वाईट वाटलं. तो जर आता हयात असला असता तर त्याने अजून छान छान काम केलं असतं.”

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२०मध्ये आत्महत्या केली. त्याच्या निधनाने मनोरंजनविश्वासह अनेकांना विशेषकरुन त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आजही त्याच्याबद्दल अनेक जण कौतुक करत बोलत असतात.