Pawan Kalyan Wife Emotional Post For Son Mark After Fire Accident : दाक्षिणात्य अभिनेते व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मुलगा मार्क याच्या अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी ८ एप्रिल २०२५ रोजी सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीत पवन कल्याण यांचा मुलगा मार्क गंभीर जखमी झाला होता. त्या अपघाताला वर्ष पूर्ण होताच पवन कल्याण यांची पत्नी अण्णा लेझनेवा यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अण्णा यांनी मोठा मुलगा अकिरा नंदनच्या २२ व्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आगीतून बचावलेल्या आठ वर्षांच्या मार्कचा हा दुसरा जन्मच आहे, अशा भावनाही व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पवन कल्याण यांची पत्नी अण्णा लेझनेवा यांनी म्हटलं आहे, “आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप भावूक आहे. आज अकिराचा वाढदिवस आहे. तो माणूस म्हणून जे घडत आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तो एक विचारी, जिज्ञासू आणि अत्यंत दयाळू मुलगा आहे. पण, आजच्याच दिवशी बरोबर एक वर्षापूर्वी लागलेल्या आगीत मार्कचा जीव थोडक्यात वाचला होता. त्यामुळे आज आम्ही आमच्या दोन्ही मुलांसाठी आनंद साजरा करत आहोत. कारण- अकिराबरोबरच मार्कचाही हा एक प्रकारे दुसरा जन्मच आहे.”

“या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरूच आहे. त्या आगीत १० वर्षांच्या चिमुरड्या फ्रेयाचा मृत्यू झाला आणि १८ मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पण, त्या दुर्घटनेसाठी नेमके जबाबदार कोण, हे आम्हाला अद्याप समजलेले नाही. काही मुलांच्या जखमा इतक्या भीषण होत्या की, त्यांच्यावर आजही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत आहे. देवाच्या कृपेने मार्क यातून सुखरूप बाहेर पडला. त्याच्या फुप्फुसांना इजा झाली होती; पण आज तो बरा आहे. तो आमच्याबरोबर आहे, हेच आमच्यासाठी सर्व काही आहे. तो श्वास घेण्यासाठी धडपडत असताना त्याच्या बेडशेजारी बसून पाहिल्याचे क्षण मला आजही आठवतात. कोणत्याही आईवर अशी वेळ कधीच येऊ नये”, असंही त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे, “अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वी ज्या धाडसी बांधकाम मजुरांनी १५ मुलांचे प्राण वाचवले, त्यांच्याबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन. ते खरे हीरो आहेत. कृपया सुरक्षित राहा. खबरदारी म्हणून घरामध्ये अग्निशामक यंत्र नक्की ठेवा. माझी प्रार्थना आहे की, ते वापरण्याची वेळ तुमच्यावर कधीच येऊ नये.”

दरम्यान, वर्षभरापूर्वी सिंगापूरमधील रिव्हर व्हॅली रोडवरील एका इमारतीला आग लागली होती. आगीच्या घटनेनंतर मार्क शंकर याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर १३ एप्रिलला तो भारतात परतला. मार्क धोक्याबाहेर आल्यानंतर अण्णा लेझनेवा यांनी तिरुमला येथे जाऊन आपले केस अर्पण करीत देवाचे आभार मानले होते.