बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. या प्रकरणी तिने पोलीसांत तक्रारदेखील दाखल केली आहे. आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले आहे. तसेच त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान पायल घोषने मीटू चवळवळीच्या वेळी डिलिट केलेल्या काही ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. पण तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरची तारीख पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

पायलने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर केले आहे. स्क्रीनशॉट शेअर करत तिने ‘माझे काही ट्विट जे मीटू चळवळीच्या वेळी माझ्या मॅनेजर आणि कुटुंबीयांकडून डिलिट करण्यात आले होते. मी मीटू इंडीयाचे नाव बदलून दुसरे काही तरी ठेवणार आहे. कारण मीटू इंडिया फेक आहे आणि काही बड्या लोकांचा यावर प्रभाव आहे’ या आशयाचे ट्विट केले आहे.

ट्विटरला गूडबाय बोलण्याची वेळ आली आहे. जो पर्यंत मीटू चळवळ थांबत नाही. मला अनेक गोष्टी सांगाची इच्छा आहे पण माझे कुटुंबीय मला काहीच बोलू देत नाहीत आणि त्यांनीच माझे ट्विट डिलिट करण्यास सांगितले असे तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये म्हटले आहे.

पण या ट्विटमध्ये पायलने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटची तारीख पाहता यूजर्सला हे नेमके कधीचे आहेत असा प्रश्न पडला आहे. तिच्या ट्विटमध्ये वर्ष २५६१ लिहिले आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्वीट पायलने केले होते.