वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी मांडणारा ‘फुला’ हा चित्रपट सांगलीतील आटपाडी गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन तयार केला आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शन आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. लोकसंस्कृतीचा वेध घेणाऱ्या या चित्रपटातून अस्सल लोकसंगीताची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
‘फुला’ या चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि सॅक्सोफोन वादक राज सोडा हेसुद्धा आवर्जून उपस्थित होते. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटात ‘कान्हा तुझी बासरी’, ‘माझा राजा मल्हारी’, ‘आसरा तू माझ्या जीवाचा’, ‘कुंकू कोरलं कपाळी’,‘मुरळी झाले मी गं बाई’, ‘कपाळी सजलं बाशिंग’, ‘डर्बीचा थरार’ अशी सात गाणी आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यांमधून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचं चित्रण करत मुरळीच्या भावभावनाही मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील गाण्यांना वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. त्यामुळे अस्सल लोकसंस्कृती आणि आशयघन गाणी असलेला ‘फुला’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव ठरणार आहे. येत्या १७ एप्रिलपासून ‘फुला’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
