scorecardresearch

Phulrani Movie Review : फुलराणी ताजीतवानी!

‘फुलराणी’ चित्रपटातील शेवंताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरची निवड तिने सार्थ ठरवली आहे.

phulrani movie review
फुलराणी

रेश्मा राईकवार

‘फुलराणी’ हा शब्द उच्चारला तरी पुलंची नाटय़कृती, अभिनेत्री भक्ती बर्वे यांची खणखणीत आवाजात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ म्हणून दणदणीत अभिनयाच्या जोरावर ऐकवणारी शेवंता या सगळय़ा गोष्टी चटकन डोळय़ासमोर येतात. कालौघात ‘ती फुलराणी’चे हे स्वगत आणि मूळ नाटय़कृतीचे विविध कलाकारांच्या संचात वा हौशी कलाकारांच्या अभिनयातून रंगलेले कितीतरी अवतार प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. मनातून हळवी असली तरी ‘तुझं गटारात घाल जा शास्तर’ हे खटक्यात म्हणणारी शेवंताच आपल्याला लक्षात राहते. अशा कितीतरी गोष्टी आठवाव्यात इतकं ‘ती फुलराणी’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनात रुतून बसलं आहे. त्यामुळे मूळ नाटय़कृतीवरून प्रेरित होऊन चित्रपट करताना तो आजच्या काळातील संदर्भानुसार करण्याचा निर्णय घेत त्यानुसार मांडणी केलेला ‘फुलराणी’ हा विश्वास जोशी दिग्दर्शित चित्रपट म्हणूनच तुलनेने ताजातवाना वाटतो.

‘फुलराणी’ चित्रपटाची मांडणी आणि त्याचा आशय हा वर म्हटल्याप्रमाणे तुलनेने ताजा आहे. तरी मुळात ही स्वप्नकथाच आहे. त्यामुळे पडद्यावर येताना सौंदर्यस्पर्धेत खरी उतरण्यासाठी धडपडणारी शेवंता तांडेलची गोष्ट आपल्याला दिसत असली तरी त्याचा बाज हा वास्तवापेक्षा स्वप्नकथेच्या अंगाने जास्त आहे. किचकट करण्यापेक्षा विषय प्रेमात खोल रंगवत सोपा – सुटसुटीत केला आहे. कोळीवाडय़ातील ‘फुलवाली’ शेवंता तांडेल आणि सौंदर्यस्पर्धासाठी तरुणींना शारीरिक-मानसिक प्रशिक्षण देत त्यांना घडवणारा विक्रम राजाध्यक्ष यांची ही कथा आहे. सातत्याने आपल्याच प्रशिक्षण संस्थेतील युवती सौंदर्यस्पर्धा जिंकते याचा अभिमान असणाऱ्या विक्रमला त्याच्या मित्राकडून फुलवाल्या शेवंताला सौंदर्यस्पर्धेसाठी तयार करण्याचं आव्हान दिलं जातं. हे आव्हान विक्रम पूर्ण करतो का? विक्रमचा अहंकार जिंकतो की शेवंताचा प्रामाणिकपणा.. या सगळय़ा गोष्टीतून आपली फुलराणी घडत जाते. या चित्रपटाची कथा अत्यंत सरळसोट आहे. यात कुठेही वळण देण्याचा वा जाणीवपूर्वक भावनिक नाटय़ पेरण्याचाही फारसा प्रयत्न करण्यात आलेला नाही. त्यामुळे एक रंजक प्रेमकथा म्हणून या चित्रपटाकडे पाहायला हवे.

‘फुलराणी’ चित्रपटातील शेवंताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरची निवड तिने सार्थ ठरवली आहे. मुळात नायिका म्हणून कुठल्याही ठरावीक साच्यात न बसणारा चेहरा आणि सहज अभिनयाच्या जोरावर प्रियदर्शिनीने आपल्या शैलीत शेवंताची भूमिका केली आहे. कोळीवाडय़ात राहात असली तरी तिला परिस्थितीचं भान आहे. ती ज्या समाजातून पुढे आली आहे आणि ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करायचे आव्हान तिच्यासमोर आहे या दोन्ही वर्गातील फरक तिला माहिती आहे. आणि तरीही तिच्या आयुष्यात आलेली संधी ती स्वीकारते. या संधीच्या निमित्ताने विक्रम राजाध्यक्ष, त्याचे वडील ब्रिगेडियर राजाध्यक्ष अशा काही व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात आणि तिचं जग बदलून जातं. या चित्रपटात ब्रिगेडियर राजाध्यक्ष आणि शेवंता यांच्यातील नातं आणि त्यांच्यातील भावनिक प्रसंग फार सहजतेने खुलून आले आहेत. अर्थात, त्याचं श्रेय ब्रिगेडियर राजाध्यक्ष यांच्या भूमिकेत असलेल्या विक्रम गोखले यांचं आहे यात शंका नाही. सुबोध भावे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विक्रम झकास साकारला आहे. त्याला असलेला गर्व, शेवंताच्या अस्सलपणात विरघळत गेलेला त्याचा तोरा आणि मनात जागलेलं निखळ प्रेम, विक्रम आणि ब्रिगेडियर या बापलेकातलं तणावाचं नातं, त्यांच्यातलं अंतर मिटून टाकणारा क्षण असे काही प्रसंग खूप सुंदर जमले आहेत. मॉडेिलगचा अनुभव गाठीशी असलेल्या आणि २०१९ च्या ‘मिस इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या मॉडेल – अभिनेत्री वैष्णवी आंधळेच्या कौशल्यांचा दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी या चित्रपटासाठी खुबीने वापर करून घेतला आहे. अभिनेता मििलद शिंदेच्या बरोबरीने गौरव मालणकरसारखा नवा चेहरा आणि गौरव घाटणेकरचा आश्वासक वावर या सगळय़ाच गोष्टी ‘फुलराणी’ चित्रपटाला काहीसा ताजेपणा देणाऱ्या ठरल्या आहेत. गाण्यांचा खूप भडिमार नाही, अगदी प्रेमकथा असूनही ‘तुझ्या सोबतीचे’ सारखे एखादेच हळुवार आणि श्रवणीय गाणे चित्रपटात आहे. प्रेमकथेला पोषक अशी मांडणी असलेला हा चित्रपट तुमचं निव्वळ मनोरंजन करतो.

फुलराणी

दिग्दर्शक – विश्वास जोशी, कलाकार – प्रियदर्शिनी इंदलकर, सुबोध भावे, विक्रम गोखले, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, गौरव मालणकर, अश्विनी कुलकर्णी, वैष्णवी आंधळे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 01:46 IST

संबंधित बातम्या