scorecardresearch

आणखी एक ‘रॉ’पट

दुसऱ्या महायुद्धाचा काळ हा एकूणच जगाच्या नकाशावर चित्रविचित्र घटनांनी भरलेला आहे.

आणखी एक ‘रॉ’पट

रेश्मा राईकवार

दुसऱ्या महायुद्धाचा काळ हा एकूणच जगाच्या नकाशावर चित्रविचित्र घटनांनी भरलेला आहे. या युद्धाचा शेवट ज्या अतिभयंकर पद्धतीने अमेरिकेने केला त्यातून जगावर कधीही न संपणाऱ्या अशा अमानवी संकटाची तलवार कायमची टांगली गेली. अण्वस्त्रांच्या निर्मितीचं तंत्र ज्यांच्या हाती, सत्तेची दोरी त्यांच्या हाती हे सूत्र भल्याभल्यांची झोप उडवणारं ठरलं. आणि अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धाच जणू देशोदेशी सुरू झाली. त्यातच भारताने पोखरणमध्ये पहिली यशस्वी अणूचाचणी केली आणि मग पाकिस्तानमध्येही त्याचे पडसाद उमटले. हाच धागा घेऊन शंतनू बागची दिग्दर्शित ‘मिशन मजनू’ची कथा आकाराला आली आहे. गेल्या काही वर्षांत ‘रॉ’चे गुप्तहेर आणि त्यांचे अनेक महत्त्वाच्या प्रसंगातील योगदान अशा स्वरूपाच्या कथा आपण हिंदी चित्रपटांतून अनुभवतो आहोत. ‘मिशन मजनू’ चित्रपटातूनही त्याच मालिकेतील एक कथा आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फाळणीनंतर भारत – पाकिस्तान यांच्यात ज्या प्रकारचं शत्रुत्व निर्माण झालं होतं त्या अनुषंगाने एकमेकांच्या देशातील कारवायांवर, घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांची पेरणी, दोन्ही देशांच्या नेतृत्वाची राजकीय मुत्सद्देगिरी आणि दोन्हीकडच्या सैन्यदलाची भूमिका.. अशा कितीतरी घटनांची जंत्री इतिहासाच्या पानापानांवर आहे. त्यातील काहींची अधिकृत नोंद आहे, तर अनेक घटना आणि व्यक्ती इतिहासाच्या पानात दडपल्या गेल्या आहेत. ‘राझी’, ‘बेल बॉटम’ अशा लागोपाठच्या चित्रपटांमधून आपण या गोष्टी पाहिल्या आहेत. त्याच घटनांशी जोडलेला ‘रॉ’च्या इतिहासातला एक धागा या चित्रपटात उलगडण्यात आला आहे. पोखरणच्या अणूचाचणीनंतर पाकिस्ताननेही अण्वस्त्र निर्मितीची योजना आखली. ज्या गुप्ततेने भारताने अण्वस्त्र चाचणी पार पाडली, त्याच हुशारीने आणि भारताला लागून असलेल्या परिसरातच अण्वस्त्र निर्मितीचा घाट पाकिस्तानने घातला. लोकशाही न मानणाऱ्या पाकिस्तानसारख्या राजकीय-सामाजिकदृष्टय़ा अस्थिर देशाच्या हाती अण्वस्त्राची ताकद म्हणजे संकटाला आमंत्रण.. परिस्थिती नियंत्रणात ठेवायची तर पाकिस्तानचे मनसुबे जगासमोर उघड करणं गरजेचं होतं. भारतातीत तत्कालीन नेतृत्वाला शांतता आणि सलोख्याच्या भूलथापांमध्ये गुंतवून ठेवत पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मितीच्या छुप्या योजनांचा पर्दाफाश रॉच्या पाकिस्तानमधील गुप्तहेरांनी यशस्वीरित्या केला. त्यांनी जीव धोक्यात घालून हे केलं नसतं तर भयंकर अशा दुर्दैवाला देश बळी पडता.. या मिशनची म्हणण्यापेक्षा ते प्रत्यक्षात आणणाऱ्या गुप्तहेराची कथाव्यथा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

हल्ली अशा सगळय़ाच चित्रपटांच्या सुरुवातीला एक पाटी दाखवली जाते. वास्तव घटनांवरून प्रेरित कथानक असा उल्लेख त्यात असतो. त्यामुळे पडद्यावर आपण जे पाहतो त्यात तथ्य किती आणि नाटय़ किती? ही विचार करायला लावणारी गोष्ट. या चित्रपटाची सुरुवातच काहीशी माहितीपटाच्या शैलीत केली गेली आहे. ‘रॉ’चे पहिले प्रमुख आर. एन. काओ (परमीत सेठी) यांच्या तोंडून ही कथा ऐकवली जाते. त्याही आधी दुसऱ्या महायुद्धाची वास्तव क्षणचित्रं आणि त्यानंतर पोखरणपर्यंतचा घटनाक्रम थोडक्यात उलगडला जातो. त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडय़ाशा गंभीरपणे या कथानकाकडे आपण पाहतो. मात्र त्यावेळचा घटनाक्रम आणि राजकीय घडामोडींचे सगळे संदर्भ खरे असले तरी इथे गोष्ट आपल्या देशासाठी स्वत:चं नाव-गाव, धर्म विसरून परक्या देशात एक वेगळी ओळख घेऊन वावरणाऱ्या आपल्या गुप्तहेरांची आहे. त्यांच्या भावभावनांची आहे. त्याला वैयक्तिक सुख-दु:खाची किनारही आहे आणि देशाप्रति असलेल्या निष्ठेबरोबरच कर्तव्य की माणूस म्हणून असलेल्या संवेदना या द्वंद्वात होणारी त्यांची ससेहोलपट यांचीही आहे. एका अर्थी भावभावनांचं अतिरेकी नाटय़ दिग्दर्शकाने मांडलेलं नाही, याचा आनंद मानायचा. तर मूळ नाटय़ही आपल्याला फारसं जोडून घेत नाही. नाही म्हणायला चित्रपटाच्या शेवटी शेवटी त्यातलं भावनाटय़ काही अंशी प्रेक्षकाला धरून ठेवतं. पण तोवर सगळा चित्रपट एका वरवरच्या मांडणीसारखा राहतो. यात फार गाणी – नाचगाणं असा प्रकार नसला तरी मूळ कथा आणि व्यक्तिरेखा यांची दिग्दर्शकीय मांडणीही तितकीशी प्रभावी वाटत नाही. चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा असल्या तरी सिद्धार्थ मल्होत्रा, शरीब हाश्मी आणि कुमुद मिश्रा या तिघांवर अधिक प्रसंग चित्रित झाले आहेत. तिन्ही कलाकारांची सहज अभिनय शैली वाखाणण्याजोगी असली तरी या तिघांमधली केमिस्ट्री पडद्यावर तेवढी रंगताना पाहायला मिळत नाही. रश्मिका मंदानाने साकारलेली नायिकाही शांत-सोज्वळ, सुंदर-प्रेमळ तरुणी आणि पत्नी यापुढे सरकत नाही. या अशा कथानकांमध्ये देशप्रेमावर उमटणारं प्रश्नचिन्ह, वैयक्तिक द्वंद्व, कधीकधी देशहिताच्याही आड येणारा आपल्याच लोकांप्रतिचा द्वेष, अहंकार असे अनेक मुद्दे इथेही कथानकाच्या ओघात उपस्थित होत राहतात. मात्र या सगळय़ाचा चित्रपटातून उमटणारा एकसंध म्हणून जो परिणाम आहे तो कुठेही जाणवत नाही. म्हणूनच की काय आणखी एक ‘रॉ’पट यापलीकडे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘मिशन मजनू’ पोहोचत नाही.

‘मिशन मजनू’
दिग्दर्शक – शंतनू बागची, कलाकार – सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदाना, शरीब हाश्मी, कुमुद मिश्रा, परमीत सेठी, झाकीर हुसैन आणि रजित कपूर.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 03:34 IST

संबंधित बातम्या