लॅण्डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल निर्मित ‘पिप्सी’ हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना लहान मुलांच्या विश्वातील रंजक सफरीचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राला ‘अ बॉटल फूल ऑफ होप’ देण्यास येत आहे. त्यापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.

‘पिप्सी’ हा सिनेमा चानी आणि बाळू यांच्या मैत्रीवर आधारित असून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शनावेळी बच्चे कंपनीने प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बालकलाकार मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी यांनी उपस्थित लहान मुलांबरोबर गप्पा-गोष्टी करत खेळांचा आनंदही लुटला.
ग्रामीण भागातील चानी आणि बाळू या दोन लहान मुलांच भावविश्व या चित्रपटातून मांडण्यात आल्यामुळे  हा सिनेमा लेक्षवेधी ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ‘राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा माणसाचा जीव माश्यात असतो’ असा समज करून, दुर्दम्य आजाराने ग्रासलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी माश्याच्या शोधात निघालेली चानी या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच, आपल्या मैत्रिणीला मदत करणारा बाळूदेखील यात असून, ‘पिप्सी’ नामक माश्याची गोष्ट या सिनेमात असल्याचे आपणास दिसून येते. समाजातील समस्येकडे लहान मुलांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष ‘पिप्सी’च्या ट्रेलरमध्ये अगदी रंजकपद्धतीने मांडण्यात आला आहे.

सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ सिनेमातील गाणी ओमकार कुलकर्णी यांनी लिहिली असून देबारपितो साहा यांचे संगीत त्यांना लाभले आहे. लहानग्यांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेला ‘पिप्सी’ हा सिनेमा केवळ बच्चेकंपनीसाठी नव्हे तर प्रौढ प्रेक्षकांसाठीदेखील आशयसमृद्ध ठरेल, अशी आशा आहे.