मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनात नसीरुद्दीन शाह सहभागी झाले होते. त्यानंतर पीयूष मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नसीरुद्दीन शाह यांना थेट सवाल केले आहेत. “फक्त निवडक मुद्द्यांवरच बोलणार का? ‘फ्लायदुबई’च्या विमानात घडलेल्या घटनेत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पराक्रमावरही दोन शब्द बोला आणि त्यांचे कौतुक करा,” अशा शब्दांत पीयूष मिश्रा यांनी शाह यांना टोला लगावला आहे.
नेमकं काय घडलंय?
शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने निदर्शने केली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नसीरुद्दीन शाह यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांनी उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर पीयूष मिश्रा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत शाह यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
व्हिडिओमधून पीयूष मिश्रांचे थेट सवाल
व्हिडिओ संदेशात पीयूष मिश्रा म्हणाले:
“आदाब अर्ज, नसीर साहेब! मी पीयूष मिश्रा, तुमचा जुना परिचित. तेल अवीववरून निघालेल्या फ्लायदुबईच्या Flight 1073 मध्ये नुकतीच एक मोठी दुर्घटना टळली. पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखले आणि १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. नसीर सर, त्यांच्या या धाडसावरही एखादी प्रतिक्रिया द्या आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करा.”
कोण आहेत कॅप्टन स्मित मच्छार?
कॅप्टन स्मित मच्छार हे भारतीय पायलट असून ‘फ्लायदुबई’ (Flydubai) या विमान कंपनीत कार्यरत आहेत. मध्यंतरी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानामध्ये सह-पायलटने विमानाचा ताबा घेऊन अपघाताचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असूनही कॉकपिटचे दार उघडून त्यांनी क्रू मेंबर्स व प्रवाशांना आत येण्याची संधी दिली. त्यांच्या या शौर्यामुळे विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचले व विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरूनही विचारला जाब
पीयूष मिश्रा यांनी ‘लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’मधील (LPU) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि पोलिसांच्या कारवाईचा उल्लेख करत नसीरुद्दीन शाह यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. “तुम्ही म्हणाला होतात की, ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय’ (NSD) आणि FTII पेक्षा या विद्यार्थ्यांनीच मला जास्त शिकवले आहे. हे विद्यार्थी कधीपासून अभिनयाचे शिक्षक झाले, हे मला माहीत नाही; पण जर ते तुमचे शिक्षक असतील, तर एलपीयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरही एखादा संदेश पाठवून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करा,” असे मिश्रा म्हणाले.
‘झारखंडच्या मदतीऐवजी पाठवली कविता’
झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीचा संदर्भ देत पीयूष मिश्रा यांनी शाह यांच्यावर सडकून टीका केली.
“मी जेव्हा झारखंडमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी तुमच्याकडे मदत मागितली होती, तेव्हा तुम्ही एका पाकिस्तानी कवीची कविता पाठवली होती. सर, तिथल्या लोकांना कवितेची नाही, तर पीठ, डाळ, भाकरी, गूळ आणि लिट्टी-चोख्याची गरज होती. आता यापुढे तुम्ही जेव्हा जेव्हा कोणतेही वक्तव्य कराल, तेव्हा तुम्हाला पीयूष मिश्राकडून असेच थेट उत्तर मिळेल.”
शाह यांच्याकडून मौन
पीयूष मिश्रा यांच्या या आक्रमक व्हिडिओवर नसीरुद्दीन शाह किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून कोलकाता, बंगळुरू आणि रांची येथेही निदर्शने करण्याची तयारी पक्षाकडून सुरू आहे.
