चाळीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर खळबळ माजवणारं वसू भगत यांचं ‘जंगली कबूतर’ हे नाटक ‘चंद्रकला’ ही नाटय़संस्था पुनश्च मंचित करत असल्याबद्दल स्वाभाविकपणेच मनात एक कुतूहल होतं. त्याकाळी भलतंच ‘बोल्ड’ ठरलेलं हे नाटक आज कसं वाटेल, हे जाणून घेण्याचं औत्सुक्यही होतंच. खरं तर ४० वर्षांपूर्वी जो विषय समाजात ‘बोल्ड’ मानला जात होता, तो आज सामान्य (नॉर्मल) वाटण्याचीच शक्यता अधिक. याचं कारण आज समाज, आजूबाजूची परिस्थिती, आपली मानसिकता, वैचारिक समज आणि विस्तारलेल्या जाणिवा हे सगळंच एवढं बदललंय, की हल्ली आपल्याला कशाचाही ‘धक्का’ वगैरे बसत नाही. नाटक, सिनेमा, दूरचित्रवाहिन्या, जाहिराती, प्रसार माध्यमं, सोशल मीडिया या सगळ्यांतून नको नको त्या गोष्टींचा एवढा प्रचंड धबधबा तिन्हीत्रिकाळ आपल्यावर कोसळत असतो, की आजकाल ज्याला आपण ‘न कळतं वय’ म्हणतो, त्या वयातल्या  मुलांनाही सगळ्या विषयांतलं सगळं काही कळू लागलं आहे. अशा युगात आपण जगत असताना ‘जंगली कबूतर’ आपल्याला हादरवून सोडेल ही शक्यताच नाही. परंतु त्याकाळी हे नाटक का गाजलं असावं, हे जाणण्यासाठी तरी नाटक पाहावं असं वाटलं. निळू फुलेंसारख्या ताकदीच्या आणि सामाजिक भान जागृत असणाऱ्या अभिनेत्याने हे नाटक केलं होतं, हाही त्यासंबंधीच्या कुतूहलाचं एक कारण होतं. या सगळ्यामुळे या नाटकाविषयीची उत्सुकता ताणली गेली होती. परंतु प्रत्यक्ष प्रयोग पाहिल्यावर मात्र निराशाच पदरी आली.
त्याची कारणं अनेक! एक तर या नाटकाच्या विषयाचं तसंच त्याच्या सादरीकरणातलं गांभीर्य या प्रयोगात अजिबातच नव्हतं. त्याच्या कर्त्यांचा नाटकाकडे पाहण्याचा बाजारू दृष्टिकोनच मुळात चुकीचा होता. सध्या जी ‘हॉट’ नाटकांची लाट आली आहे, तिचा फायदा उठवण्याचा हेतू स्पष्ट जाणवत होता. दिग्दर्शक जनार्दन लवंगारे यांच्या नाटकांचा बाज ठरलेला आहे. ‘त्यांचे’ प्रेक्षक त्याकरताच येतात. त्यामुळे खरं तर त्यांच्या या नाटकाकडून फारशा अपेक्षा धरणं योग्य नव्हतंच. तरीही का कुणास ठाऊक, ‘सदासर्वदा’ आणि मास्टर भगवान यांच्या जीवनावरील ‘अलबेला’सारखं नाटक करणारे लवंगारे या नाटकात तरी आपला नेहमीचा बाज बाजूला ठेवून नाटक बसवतील अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं ती पूर्ण होऊ शकली नाही. अर्थात त्यांनी त्यांच्या परीनं प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांना आपला मूळ ‘स्वभाव’ बाजूला सारता आलेला नाही आणि त्यामुळे नाटक फसलं आहे.
एकेकाळी दुय्यम-तिय्यम भूमिका करणारी सिनेनटी गुल (गुलाबीबाई) गेल्या काही वर्षांत फिल्म इंडस्ट्रीबाहेर फेकली गेल्यावर प्रतिष्ठित वेश्येचा धंदा करतेय. करीअरच्या सुरुवातीस घसरलेल्या पायामुळे झालेली मुलगी सोना तिनं किसनकडे सोपवलीय. तिला आपल्या वाईट जिंदगीचा वारा लागू नये आणि तिच्या असण्यानं आपल्या फिल्मी करीअरमध्ये बाधा येऊ नये, असा दुहेरी हेतू त्यामागे असतो. तिच्या नवऱ्याचा पत्ता नसला तरी तिला एक मुलगाही असतो.. मोहन. पण त्यालाही शक्यतो तिनं होस्टेलवर ठेवणंच पसंत केलेलं असतं. हेतू तोच.. जो सोनाला दूर ठेवण्यामागे होता! परंतु मोहनला गुलनं वस्तुस्थितीपासून कितीही दूर ठेवायचा प्रयत्न केला, तरीही त्याच्यापासून ती लपत नाहीच. आणि त्यानंही वास्तव आता स्वीकारलंय.
परंतु ज्या किसनवर विश्वास टाकून गुलनं आपल्या लेकीचं भवितव्य घडण्याची  स्वप्नं पाहिली होती, ती एक दिवस साफ चक्काचूर होतात. सोना अकस्मात गुलच्या घरी येते आणि तिला भयंकर धक्काच बसतो. सोनाला किसननं वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच धंद्याला लावलेली असते. आता ती ऐन विशीतली कामाठीपुऱ्यातील बनचुकी वेश्या झालेली असते. तिची असभ्य, गावठी भाषा, शरीरप्रदर्शन करणारे कपडे आणि तिचं वर्तन.. सगळंच गुलच्या पायाखालची जमीन सरकवणारं असतं.
सोनाच्या या अध:पतनाला आपणच जबाबदार आहोत असं गुलला वाटतं. तेव्हा ती स्वत:लाच बदलायचं ठरवते. याउप्पर कुणासाठी कॉलगर्ल म्हणून काम करायचं नाही. सोनालाही हळूहळू बदलायचं. तिला माणसांत आणायचं आणि पंडितसारख्या (मोहनचा मित्र) एखाद्या चांगल्या मुलाशी तिचं लग्न लावून द्यायचं. यासाठी ती हेतुत: पंडित आणि सोनाला एकत्र आणू पाहते. तिचा हेतू साध्य होतोही. पंडित तिच्याशी लग्नाला तयार होतो. त्याला सोना आवडलेली असते. सोनालाही तो! पण..
मात्र सहजगत्या मिळणाऱ्या पैशांना चटावलेली सोना आता माघारी फिरायला राजी नसते. तिला अधिकाधिक पैसा मिळवायचा असतो. आणि गुलच्या ओळखीतल्या बडय़ा धेंडांना आपल्या मोहजालात अडकवून तिला ते साध्य होणार असतं. गुलचा एक धंदेवाईक यार चंदन याला हे नवं जंगली कबूतर आवडतं. एवीतेवी गुलचं तारुण्य उताराला लागलेलं असतंच. तेव्हा तिनं तरुण पोरी ठेवून त्यांच्याकरवी धंदा करावा असं तो बरेच दिवस तिला सुचवत असतो. आता आयतंच हे पाखरू घरात आलंय म्हटल्यावर तिचा वापर गुलनं धंद्यासाठी करावा असं चंदन गुलला सांगतो. गुल भयंकर चिडते. त्याला चालतं व्हायला सांगते. पण सोनाला चंदनच्या पैशांची, त्यानं दाखवलेल्या उंची स्वप्नांची भूल पडते. ती गुलला निक्षून सांगते- ‘मी चंदनबरोबर जाणार.’
नाटकाचा शेवट काय होतो, हे सांगण्यात मतलब नाही.
खरं तर हे नाटक एका प्रवाहपतितेच्या दारुण जीवनावरचं नाटक आहे. एकदा धारेला लागलेलं आयुष्य फिरून कधीच सावरता येत नाही. परंतु पोटच्या मुलीचं आयुष्यही काळोखाच्या गर्तेत जाताना पाहणं यापरती दुसरी शोकांतिका नाही. ‘जंगली कबूतर’चा विषय माणसाच्या माणूसपणाशी निगडित आहे. परंतु तरीही लेखकानं त्याला असं धंदेवाईक नाव का द्यावं, कळत नाही. कदाचित त्यालाही धंद्याची गणितं मांडायची होती का? निळू फुलेंसारख्या अभिनेत्याला यातलं मन विदीर्ण करणारं समाजदर्शन भावलं असावं. नाटक मेलोड्रॅमॅटिक आहे, त्याची बांधणी कच्चीआहे, त्यात अनेक दोष आहेत, हे त्यांनाही जाणवल्याशिवाय राहिलं नसणार. परंतु तरीही या नाटकातलं निखळ जीवनदर्शन डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं असल्याने त्यावेळच्या कलावंतांनी ते उचलून धरलं असणार यात शंका नाही.
पण ‘चंद्रकला’संस्थेनं सादर केलेला ‘जंगली कबूतर’चा प्रयोग संहितेतल्या या विचारांशी फटकून आहे. नाटकातले दोष त्यात प्रकर्षांनं समोर येतात. किसनची भूमिका करणारे जनार्दन लवंगारे आपल्या नित्याच्या ‘इनोदी’ शिक्क्य़ातून बाहेरच आलेले नाहीत. खलनायकी किसन त्यांनी हास्यास्पद पद्धतीनं सादर केला आहे. नूतन जयंत यांनी गुलची व्यथा-वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे खरा; परंतु त्या भूमिकेच्या खोलात न शिरल्यानं गुलची तगमग, तिची परिस्थितीनं केलेली कोंडी आवश्यक त्या तीव्रतेनं बाहेर येत नाही. मिलिंद सफई यांनी मात्र रोखठोक व्यवहारी बिझनेसमन चंदन उत्तम वठवला आहे. आदेश वढावकर यांचा सरळमार्गी मोहन ठीक. पंडितचं निरागसपण अमित कदम यांनी नीट दाखवलं असलं तरी त्यांच्या अभिनयातलं कच्चेपण उघडं पडतं. मादक सोनाची धंदेवाईक वृत्ती, चटावलेपण आणि असभ्य गावरानपणा निर्मला चव्हाण यांनी ठसक्यात दाखवला आहे. नाटकाच्या तांत्रिक अंगांत उल्लेखनीय असे काही नाही.

Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Clay idols, potters, Solapur,
मातीच्या मूर्तींची होते घरोघरी प्रतिष्ठापना ! सोलापूरजवळील गावांमध्ये वंशपरंपरेने कुंभार समाजाची सेवा
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Loksatta vyaktivedh Avinash Avalgaonkar Chancellor of Riddhapur Marathi Language University
व्यक्तिवेध: डॉ. अविनाश आवलगावकर
Chaturanga Pratishthan, golden anniversary,
चतुरंग प्रतिष्ठानचा २८ – २९ सप्टेंबरला सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा, विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांना गौरवण्यात येणार
History researcher Raj Memane research on Songiri Mirgad castle Pune news
सोनगिरी, मीरगड हे दोन वेगळे गड; इतिहास संशोधक राज मेमाणे यांचे संशोधन
Nitesh Rane, Anil Deshmukh, Sanjay Raut,
देशमुख, राऊत यांच्या भोजनावळीत कुख्यात गुंड, नितेश राणे यांचे ट्विट