संपर्कातून परसणाऱ्या करोना व्हायरसने सध्या संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेला उद्या म्हणजे २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. तसेच बॉलिवूड कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संदेश देत आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीमधील अभिनेता कार्तिक आर्यनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा जनजागृतीचा संदेश देणारा व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी देखील शेअर केला आहे.

कार्तिकने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात ज्याप्रमाणे पाच मिनिटे सलग एक डायलॉग बोलून दाखवला होता. त्याचप्रमाणे त्याने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलग अडीच मिनिटे बोलून लोकांना संदेश दिला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लोकांनी घरातून बाहेरपडू नये तसेच करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सुट्टी जाहिर केल्याचे म्हटले आहे. ‘सोशल डिस्टन्सिंगसाठी मी माझ्या अंदाजात लोकांना आवाहन करतो’असे कॅप्शन त्याने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

कार्तिकचा हा ‘प्यार का पंचनामा’ अंदाज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत ‘या तरुण कलाकाराला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे… सध्या जास्त सावध होण्याची गरज आहे आणि करोनाचा पंचनामा करण्याची देखील’ असे त्यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले आहे.

नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेला उद्या म्हणजे २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळ्याणत आल्या आहेत असे मोदींनी म्हटले आहे.