प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. ‘वॉईज ऑफ लव्ह’ अशी ओळख असणारे कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’च्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गज श्रद्धांजली वाहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी केके कॉन्सर्टवरुन परत आल्यानंतर ग्रॅण्ड हॉटेल येथे कोसळला. हे हॉटेल मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. केकेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. अनेक प्रसिद्ध गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. नुकंतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केके यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबतच अक्षय कुमार, वरुण धवन, मृणाल ठाकूर, अभिषेक बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांनी केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

“प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून फार दु:ख झाले. त्यांची गाणी ही सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये लोकप्रिय ठरली. त्या सर्व वयोगटातील व्यक्तींच्या भावनांचे प्रतिबिंब होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम राहिल. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्याप्रती मी दु:ख व्यक्त करतो. ओम शांती”, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

“अभी अभी तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…”; ‘केके’च्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल

“के.के.च्या दुःखद निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. हे आपलंच नुकसान आहे. ओम शांती”, असे म्हणत अभिनेता अक्षय कुमारने त्याला श्रद्धांजली वाहिली.

“आमच्या लाडक्या के.के.च्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर फार दु:ख झाले. तसेच एक जबरदस्त धक्काही बसला. तो एक असा संगीतकार आहे, ज्याच्या आवाजाने मी माझ्या बालपणीचा बराच काळ घालवला”, असे अभिनेता वरुण धवनने म्हटले.

तर अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने ‘केके’ असे लिहित हार्ट ब्रेकचा इमोजी शेअर केला आहे.

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

त्यासोबतच अभिषेक बच्चन यानेही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. “ही खूप धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. केके, तुम्ही तुमचे टॅलेंट आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण तू फार लवकर गेलास”, असे अभिषेकने म्हटले आहे.

केके याने माचीस (छोड़ आये हम वो गल्ल्यां) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण केके ला खरी ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून मिळाली. त्यात त्याने ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे गायले होते. केके याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. केके यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.