त्यांच्या लेखणीतून उतरलेला प्रत्येक शब्द जणू काही लाखामोलाचाच. शब्दांचं सामर्थ्य काय असतं, हे त्यांच्याहून चांगलं कोणीच जाणत नसावं बहुधा. ते लेखक आहेत, कवी आहेत, चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते आहेत शब्दांवर अधिराज्य गाजवणारे गुलजार…. आणि त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर भाळलेली ती आहे सौंदर्यवती राखी. बंगाली साहित्यापासून प्रेरणा घेतलेल्या गुलजार यांनी १५ मे १९७३ मध्ये संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या उपस्थितीत अभिनेत्री राखीसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या आयुष्याच्या या नव्या वळणावर शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती.

राखी आणि गुलजार यांच्या आयुष्याचा गाडा सुरळीत सुरु होता. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मेघना या लाडक्या मुलीचं आगमन झालं. पण, मेघनाच्या जन्मानंतर अवघ्या एक वर्षातच या जोडप्याच्या नात्यात दुरावा आला. त्या दोघांनीही विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. राखी आणि गुलजार नेमके वेगळे का झाले, याविषयी बऱ्याच शक्यता आणि स्वरचित अंदाजही वर्तवण्यात आले. पण, खरंतर याची सुरुवात त्यांच्या लग्नाच्याही आधीपासूनच झाली होती. राखीचं चित्रपटांत काम करण गुलजार यांना काही रुचलं नव्हतं. त्यामुळे राखी यांनीही गुलजार यांच्या निर्णयाला कोणताच विरोध न करता मोठ्या धीराने त्यांच्या निर्णयाचे पालन केले. राखीला गुलजार यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही. असं असलं तरीही त्यांना इतर चित्रपटांचे प्रस्ताव येणं सुरुच होतं. पण, चित्रपटांत काम न करु देण्यामागचं आणि स्वत:च्या चित्रपटांसाठी आपली निवड न करण्यामागचं नेमकं कारण काय, असं राखीने विचारताच गुलजार यांचं उत्तर पटण्याजोगं नसायचं. ज्यांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु झाल्याचं म्हटलं जातं.

हा किस्सा आहे १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंधी’ चित्रपटाच्या वेळेचा. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राखी आणि गुलजार काश्मिरला पोहोचले होते. गुलजार चित्रपटाच्या चित्रीकरणात स्वत:ला गुंतवून ठेवत होते. पण, त्याचवेळी राखी मात्र त्या ठिकाणी एकटयाच पडल्या होत्या. या साऱ्यातच एक असा प्रसंग घडला ज्यावेळी राखी यांना राग अनावर झाला. ‘आंधी’चे स्टार कलाकार सुचित्रा सेन आणि संजीव कुमार त्यावेळी पार्टी करत होते. संजीव कुमार यांनी तेव्हा फार मद्यपान केल्याचं सांगण्यात येतं. याचवेळी जेव्हा थकलेल्या सुचित्रा यांनी खोलीत जाऊन आराम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी संजीव कुमार यांनी तिचा हात पकडत तिथेच थांबण्याचा आग्रह केला. परिस्थिती पाहून सुचित्रा यांनी संजीव कुमारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी गुलजार त्यांच्या मध्ये आले आणि या पेचातून सुचित्रा यांची सुटका केली. सुचित्रांना त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवल्यानंतर त्या अभिनेत्रीच्या रागाचा पारा खाली उतरेपर्यंत ते तिथेच थांबले.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

पण, परतल्यानंतर इथे वेगळीच परिस्थिती त्यांच्या समोर होती. सुचित्राला थेट त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला जाण्यामागचं नेमकं कारण काय होतं, हेच राखी यांना जाणून घ्यायचं होतं. सर्वांसमोर उगाचच विषयाची वाच्यता नको म्हणून गुलजार यांनी राखीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी मात्र गुलजार यांच्याकडून सर्वकाही जाणून घेण्याचा पाढाच लावला. काही स्टाफ मेंबर्स आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर गुलजार आणि राखीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. इतकत नाही तर गुलजार यांनी त्यांच्या पत्नीवर हातही उगारला होता, असे काही वेबसाईटने म्हटले आहे.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

त्याच्याच दुसऱ्या दिवशी राखीने यश चोप्रा यांची भेट घेतली. ते ‘कभी कभी’ या चित्रपटाच्या निमित्ताने काश्मीरमध्ये आले होते. राखीने त्या चित्रपटातही काम करु नये यासाठी गुलजार यांनी फार प्रयत्न केले पण, आता त्याचा काहीच फायदा नव्हता. कारण, आपल्याला मिळालेली त्या रात्रीची वागणूक राखीही विसरु शकल्या नव्हत्या. त्या क्षणापासूनच राखी- गुलजार यांच्या नात्यात ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली आणि त्यांच्या नात्याची समीकरणंच बदलल्याचं म्हटलं जातं.