अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आलियाचं प्रोडक्शन वेंचर असलेल्या ‘होली काउ’ मधील तिच्या सह निर्मातीने तिच्या विरोधात ही तक्रार दाखल केलीय. सह निर्माती मंजू गहरवालने आलियावर ३१ लाख रुपये न दिल्याचा आरोप केलाय. हे पैसै मंजू यांनी सिनेमामध्ये गुंतवले होते. या पैशांसाठी त्यांनी आलियाशी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताच संपर्क न झाल्याने मंजू यांनी २० जूनला पोलिसात तक्रार दाखल केली.

कलाकारांना दिलेले चेक झाले बाउंस

मंजू गहरवाल यांनी आलिया सिद्दीकीवर फसवणुकीसोबतच मानसिक छळ केल्याचाही ओरोप केलाय. ईटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मंजू म्हणाल्या, “मी आणि आलिया २००५ सालापासून मैत्रीणी आहोत. तिला आधीपासूनच प्रोड्यूसर बनायचं होतं. जेव्हा आम्ही प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली तेव्हा तिने क्रिएटिव्ह कामांची जबाबदारी मला दिली तर पैशांचे व्यवहार ती स्वत: पाहत होती. मी कास्टिंग केलं. कलाकारांना चेक दिले गेले मात्र ते बाउंस होवू लागले. ” असं मंजू यांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलींसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मल्याळी अभिनेत्याला अटक

आलियाने मंजूच्या वडिलांना देखील सिनेमासाठी गुंतवणूक करण्यास तयार केलं होतं. यासाठी मंजूचे पिता त्यांचं उज्जैनमधील घर विकणार होते असं मंजू यांनी सांगितलं. मात्र तसं घडलं नाही. ‘हॉली काउ’ सिनेमासाठी आलियाने मंजूला क्रेडीट देण्यास नकार दिल्याने दोघींमध्ये वाद निर्माण झाला.

मंजूकडे असलेल्या एका हार्ड डिस्कमध्ये ‘होली काउ’ सिनेमाचा बराचसा डेटा होता. त्यामुळे आलियाने २२ लाख रुपये देऊन ही हार्ड डिस्क मिळवली. यानंतर मंजू तिची उरलेले ३१ लाख रुपये घेण्यासाठी आलियाशी संपर्क करू लागली मात्र आलियाशी तिचा संपर्क होऊ शकला नाही. मंजूने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीमध्येही तक्रार दाखल केलीय.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी आता आलियाने मेडिकल रिपोर्ट सादर करत अवधी वाढवून मागितला आहे. आलियाचा ‘होली काउ’ सिनेमा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे. साई कबीर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तर सिनेमात संजय मिश्रा आणि तिग्मांशु धूलिया मुख्य भूमिकेत झळकणार आहे.