बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती ट्रोल देखील होते. काही दिवसांपूर्वी कंगनाने १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. यानंतर आता कंगनाने तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहेत. यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.

तसेच दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार, “शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार करण्यात आली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की या वक्तव्याविरोधात प्राधान्याने तक्रार दाखल करुन घ्यावी. तसेच याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे या व्यवस्थापन कमिटीने पोलिसात तक्रार दाखल करताना म्हटलं आहे.

कंगना रणौत नेमकं काय म्हणाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली होती. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून कंगना रणौतने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वर्षाहून अधिक काळ वादात असलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आणि त्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक आणले जाईल असेही तिने म्हटले होते.

“रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर..”; कृषी कायदे मागे घेतल्याने संतापली कंगना

संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन, असे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांना पटवून देऊ शकलो नाही, आमची तपश्चर्या कमी होती, त्यामुळे आम्हाला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे, असेही कंगना म्हणाली.