scorecardresearch

Oscar 2022: “विल स्मिथला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले होते”, निर्मात्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला “मी ख्रिस रॉकसोबत…”

ख्रिस रॉकला कानाखाली लगावल्यानंतर विल स्मिथला होणार होती अटक?

Will Smith, Oscars slap, Netflix stop Will Smith film production, Fast and Loose, chris rock oscars, क्रिस रॉक, विल स्मिथ, नेटफ्लिक्स, ऑस्कर २०२२
विल स्मिथबाबत नेटफ्लिक्सनं मोठं पाऊल उचललं आहे.

संपूर्ण सिनेजगताला प्रतिक्षा लागलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा सोमवारी पार पडला. करोनानंतरच्या मनोरंजन समीकरणांनी बदलत असलेल्या ऑस्कर सोहळय़ात यंदाही कुणा एका चित्रपटाला महत्त्वाच्या आणि मानाच्या पुरस्कारांवर तगडे वर्चस्व राखता आलं नाही. मात्र यावेळी ऑस्कर पुरस्कार सोहळा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला. अभिनेता विल स्मिथने सोहळ्याचं सूत्रसंचालन करणाऱ्या ख्रिस रॉकला कानाखाली मारली आणि सगळीकडेच ऑस्करची चर्चा सुरु झाली. दरम्यान आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलीस अधिकारी विल स्मिथला अटक करण्यासाठी तयार होते अशी माहिती निर्माते विल पॅकर यांनी दिली आहे.

नेमकं काय झालं होतं?

ख्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. येताच त्याने एक विनोद केला. ख्रिसने यावेळी विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. यामुळे चिडलेल्या विल स्मिथने थेट स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकच्या कानाखाली मारली. काही वेळासाठी सर्वांना हा स्टंट वाटला, मात्र नंतर हे खरोरखच घडलं असल्याचं लक्षात आलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.

Oscar 2022: विल स्मिथने कानाखाली लगावल्यानंतर अखेर ख्रिस रॉकने सोडलं मौन; म्हणाला “जेव्हा वेळ येईल…”

विल स्मिथ इतका का भडकला?

विल स्मिथच्या पत्नीचे नाव जेडा पिंकेट स्मिथ आहे. ऑस्कर सोहळ्यादरम्यान ती विलसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती. यावेळी अभिनेता-कॉमेडियन ख्रिस रॉक स्टेजवर आला. त्याने जेडाची खिल्ली उडवली. ख्रिस जेडाला G.I. Jane २ मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे असे यावेळी म्हटले. यावेळी, विल स्मिथ स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिस रॉकला कानाखाली मारली. स्टेजवरून खाली आल्यानंतर विल स्मिथने ख्रिसला ओरडून सांगितलं की, तुझ्या तोंडून माझ्या पत्नीचे नाव घेऊ नको.

पोलील विल स्मिथला अटक करण्यासाठी होते तयार –

विल स्मिथने पुरस्कार मिळाल्यानंतर माफी मागितली होती. पण हे तितकंस पुरेसं नव्हतं. या धक्कादायक घटनेनंतर ऑस्करचे निर्माते विल पॅकर यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं. “पोलीस आले तेव्हा मी ख्रिस रॉकसोबत बसलो होतो”, अशी माहिती त्यांनी ABC Television सोबत बोलताना दिली आहे. “पोलीस यावेळी आम्ही त्याला अटक करण्यासाठी तयार आहोत, तुम्ही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करु शकता. आम्ही त्याला अटक करु शकतो असं सांगत पोलीस पर्याय सुचवत होते. पण ख्रिस रॉक फार त्या पर्यायांचा जास्त विचार करत नव्हता. आपण ठीक असल्याचं तो सांगत होता,” असं विल पॅकर यांनी सांगितलं आहे.

विश्लेषण : पत्नीचे नाव घेताच ऑस्करच्या मंचावर विल स्मिथने क्रिस रॉकला कानाखाली का मारली? जाणून घ्या…

लॉस एंजेलिस पोलिसांनी ख्रिस रॉकला सर्व पर्याय दिल्यानंतर तुम्हाला काही कारवाई करायची आहे का? अशी विचारणा केली असताना त्याने नाही असं सांगितलं. याआधी पोलिसांनी ख्रिस रॉकने तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचं सांगितलं होतं.

विल स्मिथच्या पत्नीला कोणता आजार?

जेडाला अलोपेसिया नावाचा आजार आहे, त्यामुळे तिच्या डोक्यावरील केस गळत आहेत. तिने पहिल्यांदा २०१८ मध्ये याबद्दल भाष्य केलं होतं आणि तेव्हापासून तिने सोशल मीडियावर या स्थितीसह जगण्याच्या तिच्या आव्हानांबद्दल माहिती दिली होती. अंघोळ करताना मूठभर केस हातात आल्यानंतर केस लहान करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते. “माझ्या आयुष्यातील हा एक प्रसंग होता जेव्हा मी अक्षरशः भीतीने थरथर कापत होतो. म्हणूनच मी माझे केस कापले,” असे ती म्हणाली होती.

म्हणूनच क्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीबाबत G.I. Jane २ या चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटात डेमी मूरने साकारलेले जॉर्डन ओ. नीलचे पात्र टक्कल पडलं आहे. ख्रिसने जेडाच्या आजाराची खिल्ली उडवली आणि तिला G.I. Jane २ मध्ये पाहण्याबद्दल भाष्य केलं होतं.

विल स्मिथने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर मागितली माफी

विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला असता त्याने आभार मानताना माफी मागितली. विल म्हणाला, “मला अकादमीची माफी मागायची आहे. बाकी नामांकन मिळलेल्या लोकांची मला माफी मागायची आहे.”

ख्रिस रॉकने दिली प्रतिक्रिया –

बुधवारी रात्री ख्रिस रॉक बोस्टनमधील एका स्टँडअप शोसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने मंचावर प्रवेश करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं. यानंतर काही वेळाने त्याने उपस्थितांशी संवाद साधला आणि ऑस्करच्या मंचावर विल स्मिथने लगावलेल्या कानाखालीचा उल्लेख केला. ख्रिसने प्रेक्षकांना सांगितलं की, “जे काही झालं त्याबद्दल भाष्य करण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाही, त्यामुळे जर तुम्ही त्याबद्दल ऐकण्यासाठी आला असाल तर माझ्याकडे एक पूर्ण शो आहे जो मी या विकेंडच्या आधी लिहिला आहे”.

पुढे त्याने म्हटलं की, “जे काही घडलं ते मी अजूनही पचवत आहे. एखाद्या क्षणी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी याबद्दल बोलेन आणि ते गंभीर तसंच मजेदार असेल”.

ख्रिस रॉक कोण आहे?

ख्रिस रॉक एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. तो ‘बेव्हरली हिल्स कॉप’ आणि ‘मेडागास्कर’ चित्रपट मालिकेचा भाग आहे. ख्रिस रॉक १९९० च्या दशकात ‘सॅटर्डे नाईट लाइव्ह’ या आगामी टीव्ही मालिकेमधून प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हापासून, ख्रिस पन्नास टीव्ही मालिकांचा भाग आहे, त्यापैकी बहुतेक कॉमेडी शो आहेत. १९९९ मध्ये, तो विल स्मिथसोबत ‘टोरन्स राइजेस’ नावाच्या मॉक्युमेंटरीमध्ये दिसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police were ready to arrest will smith says oscars producer after chris rock slapgate sgy