रेश्मा राईकवार
दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या थरारक ॲक्शनपटांसाठी प्रसिद्ध आहेच, पण त्याने रुपेरी पडद्यावर ‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून पोलिसी कथांची रुपेरी पडद्यावर उभी केलेली चित्रपट मालिका जास्त कौतुकाचा विषय ठरली आहे. त्याच्या कल्पनेतून रुपेरी पड़द्यावर साकारलेले पोलिसांचे विश्व (कॉप युनिव्हर्स) आता ओटीटी माध्यमांपर्यंत विस्तारले आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ नावाने रोहित शेट्टीची निर्मिती असलेली वेबमालिका ॲमेझॉन प्राइमवर झळकणार आहे. सध्या या वेबमालिकेबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, मात्र मालिकेच्या ओटीटी प्रदर्शनासाठी आणखी थोडी कळ सोसावी लागणार असल्याची माहिती रोहित शेट्टीने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शेट्टी सध्या केपटाऊनमध्ये ‘फीअर फॅक्टर : खतरों के खिलाडी’ या प्रसिद्ध रिॲलिटी शोच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सातव्यांदा या शोचे सूत्रसंचालन करत असलेल्या रोहितने आपण या शोच्या टीमसह जुलैमध्ये भारतात परतणार असल्याची माहिती केपटाऊनहून बोलताना दिली. ‘आम्हाला केपटाऊनमध्ये येऊन पंधराहून अधिक दिवस झाले आहेत. यंदाचे या शोचे बारावे पर्व असून याआधी कधीही पाहिले नसतील इतके कठीण साहसी खेळ या शोतील स्पर्धकांना खेळावे लागले आहेत. आत्तापर्यंतच्या शोमधील हे सगळय़ात खर्चीक पर्व असून बहुतांशी खर्च हा या नव्या साहसी खेळांसाठी झाला आहे’, असे त्याने सांगितले. या शोचे सूत्रसंचालन याआधी अक्षय कुमार, अर्जुन कपूर अशा वेगवेगळय़ा कलाकारांनी केले आहे. मात्र रोहित शेट्टीला या शोचा सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. साहस हे रक्तात भिनलं आहे. र्अध आयुष्य अॅमक्शनपट करण्यात गेलं आहे. त्यामुळे अॅहक्शनदृश्यांची वा या शोची भीती वाटत नाही, असं तो सांगतो. दरवेळी या शोमध्ये येणाऱ्या नव्या स्पर्धकांशी काही आधीची ओळख नसते, त्यामुळे फार कमी वेळात त्या कलाकारांना समजून घेऊन त्यांना साहसखेळासाठी तयार करण्याचं आव्हान असतं, असं तो म्हणतो. हा शो पूर्ण करून जुलैमध्ये तो केपटाऊनहून परतणार आहे. त्यानंतर ‘इंडियन पोलीस फोर्स’चे चित्रीकरण पूर्ण करण्यावर भर असेल, अशीही माहिती त्याने दिली.

मुळात ह़ॉलीवूड चित्रपट मालिकांच्या धर्तीवर अशा पद्धतीने पोलिसी विश्व रंगवण्याची कल्पना त्याला कशी सुचली?, याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘सिक्वलपट आपल्याकडे आता आता जास्त रुळले आहेत. त्याआधी असा काही विचार डोक्यात नव्हता’. २०११ मध्ये त्याने अभिनेता अजय देवगणला घेऊन केलेला ‘सिंघम’ हा पहिला पोलिसांवरचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ‘सिंघम रिटर्न्सि’ हा त्याचा सिक्वलपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर चार वर्षांनी रोहितने रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेऊन ‘सिम्बा’ हा चित्रपट केला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ‘कॉप युनिव्हर्स’ ही संकल्पना सुचली, असे रोहितने सांगितले. त्यामुळे लगोलग अक्षय कुमारला घेऊन ‘सूर्यवंशी’चा घाट घातला गेला. आता या पोलिसी विश्वाचा विस्तार ओटीटीवर होणार असल्याचे त्याने सांगितले. ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेबमालिका याच संकल्पनेचा पुढचा भाग ठरणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्राबरोबर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वेबमालिकेचे दिग्दर्शन रोहित शेट्टी आणि त्याचा सहकारी सुशवंत प्रकाश यांचे असणार आहे. ही वेबमालिका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मालिका – चित्रपटांप्रमाणे भव्य बनवण्याचा माझा मानस आहे. सध्या वेबमालिकेचे चित्रीकरण पूर्ण होणे बाकी आहे, असेही त्याने सांगितले. ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबमालिकेतून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही ओटीटीवर पदार्पण करतो आहे. २० एप्रिलपासून या वेबमालिकेचे गोव्यात चित्रीकरण सुरू झाले आहे.

तीन वेगवेगळे पोलिसांवरचे चित्रपट आणि आता वेबमालिका या माध्यमातून चार वेगवेगळय़ा अभिनेत्यांना त्याने ‘पोलीस’ म्हणून रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केले आहे, आता या ‘कॉप युनिव्हर्स’मध्ये पुढचा चेहरा कोणत्या अभिनेत्याचा असेल?, असे विचारल्यावर नवा चित्रपट येईल तेव्हा नवा चेहरा कोण असेल?, हे तुम्हाला कळेलच असं तो हसत हसत सांगतो. अॅटक्शनपट प्रेक्षकांना आवडतात आणि त्यामुळेच त्याने ज्या पोलिसांच्या कथा रुपेरी पडद्यावर मांडल्या त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे तो म्हणतो. सध्या ‘सिंघम’चा चौथा चित्रपट काढण्याची इच्छा आहे, मात्र तशी योग्य कथा मिळाल्याशिवाय ते शक्य नाही, असे त्याने स्पष्ट केले. त्याआधी ‘सिम्बा २’ प्रदर्शित होईल, त्याच्यावर काम सुरू असल्याचेही त्याने सांगितले.
रोहित शेट्टीचा पहिला यशस्वी चित्रपट म्हणून ‘गोलमाल’ची ओळख आहे. त्यानंतर ‘गोलमाल’चे जेवढे सिक्वलपट आले ते सगळे यशस्वी ठरले. त्यामुळे ‘गोलमाल’वर आपले पहिले प्रेम आहे, असे तो म्हणतो. त्याचाही पुढचा चित्रपट येणार आहे, पण त्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policy outlines director rohit shetty action films movies exhibition amy
First published on: 03-07-2022 at 00:01 IST