दहा वर्षांत आठ चित्रपट या संयत वेगाने नवनवीन प्रयोग करण्यात दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांचा हातखंडा राहिला आहे. प्रत्येक प्रयोगात त्यांना यश मिळालेच आहे असे नाही. त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य सांगायचे तर त्यांचे विषय नेहमीच्या पठडीतील स्टोरी मटेरियलपेक्षा वेगळा ट्रॅक पकडणारे असते. ‘पाँडिचेरी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ते असाच आणखी एक चौकटीबाहेरचा प्रयोग करत आहेत.

चित्रपट म्हटल्यास, लाइट्स..कॅमेरा आणि अॅक्शन हे आपल्या डोक्यात अगदी सहजच येतं. यापैकी कॅमेरा हा चित्रपटाचा सर्वांत अविभाज्य भाग. कॅमेरा जितका महागडा आणि प्रगत तितकीच चित्रपटाची प्रत उत्तम असं म्हणतात. पण याउलट आता कुंडलकर एक संपूर्ण चित्रपटच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट करणार आहेत. या चित्रपटाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाल्याचं त्यांनी स्वत:च्या फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं आहे.

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार ‘मस्ती की पाठशाला’!

‘संपूर्णपणे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होत असलेली माझी पूर्ण लांबीची फिल्म. कामाच्या प्राथमिक तयारीला उत्साहाने सुरुवात. ह्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटात सामील झालेल्या माझ्या दोन आवडत्या कलाकारांचे स्वागत,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यासोबतच सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी यांचेही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. म्हणजेच या दोघांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची कथा काय असणार, आणखी कोणकोणत्या भूमिका त्यात असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तेव्हा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट झालेला पहिलावहिला असा अनोखा मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.