यश त्याला मिळायला हवं, हे खरं म्हणजे त्याने घेतलेलं दडपण नाही. पण तरीही हा प्रश्न त्याला गेली काही रात्र जागवतो आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याला न भूतो न भविष्यति अशी लोकप्रियता मिळाली. एकीकडे या लोकप्रियतेचा आनंद घ्यावा, तर या चित्रपटाच्या यशामुळे जी ओळख इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अचानक सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, नाही म्हटलं तर या ओळखीचं असं एक दडपण आपल्यावर असल्याचं प्रभास मान्य करतो. सुजीत दिग्दर्शित ‘साहो’ या चित्रपटाद्वारे प्रभास बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. त्यानिमित्ताने बोलताना या चित्रपटाचं प्रदर्शन जसं जवळजवळ येतं आहे तसतसं हा ताण वाढत चालला असल्याचंही तो मोकळेपणाने कबूल करतो.

तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीत सुपरस्टार ठरलेल्या प्रभासशी बोलताना कितीही टाळलं तरी ‘बाहुबली’च्या उल्लेखाशिवाय सुरुवातच करता येत नाही. खुद्द त्यालाही त्याची कल्पना आहे. आजवर जे चित्रपट केले होते, काम केलं होतं ते सगळं ‘बाहुबली’च्या यशाने धुऊन टाकलं. आता जो प्रवास सुरू झाला आहे तो पूर्णपणे नवीन आहे, एक कलाकार म्हणून जगभरात जी ओळख मिळाली आहे त्याचा या प्रवासावर जास्त पगडा असल्याचं तो सांगतो. ‘बाहुबली’ हा चित्रपट स्वीकारला तेव्हा दिग्दर्शक म्हणून राजामौलींवर विश्वास होता. त्यांच्या डोक्यात एखादा विषय, विचार आला म्हणजे ते त्याचा ध्यास घेऊन तो प्रत्यक्षात उतरवणारच यात शंका नव्हती. सुरुवातीला खरं म्हणजे दोन्ही भाग एकत्र चित्रित करू शकू, असा विश्वास वाटला होता. पण बजेट कमी पडल्यामुळे ते साध्य झालं नाही. तेव्हा हा चित्रपट जर तेलुगूमध्ये चालला तर तो मल्याळम आणि तमिळमध्येही चालेल, एवढाच विचार आम्ही केला होता. मुळात, त्यावेळी तेलुगूमध्येही अशी एका काळातील युद्धकथा प्रेक्षकांनी पाहिलेली नव्हती. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट स्वीकारतील का, याबद्दलही थोडी धास्ती होती. या चित्रपटाने प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे, एवढाच माफक विचार आम्ही केला होता. मात्र तो प्रमाणाबाहेर यशस्वी ठरला आणि सगळी गणितंच बदलली, असं प्रभास म्हणतो.

‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी प्रभासने आपल्या कारकिर्दीची पाच र्वष दिली होती. त्यामुळे निदान हा  चित्रपट यशस्वी झाल्यावर तरी तो लगोलग चित्रपट स्वीकारेल आणि प्रेक्षक त्याला पाहू शकतील, अशी अटकळ होती. मात्र, ‘साहो’साठीही दोन र्वष गेली आहेत. ‘बाहुबली’नंतर मला एखादा हलकाफुलका रोमँटिक चित्रपट करायचा होता. त्यासाठी प्रयत्न करत होतो आणि हातात पडला तो ‘साहो’सारखा भव्य अ‍ॅक्शनपट. हा चित्रपट करताना वर्षभरात तो पूर्ण होईल, असा अंदाज होता. पण प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मात्र हे काम अवघड असल्याचं लक्षात आलं असं तो सांगतो. ‘साहो’सारखा भव्य-दिव्य अ‍ॅक्शनपट करायचा म्हटल्यावर त्यात खूप उच्च दर्जाची अ‍ॅक्शनदृश्ये असणार होती. त्यासाठी काही गोष्टींचे संदर्भ आमच्याजवळ नव्हते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना त्याचा बारीकसारीक अभ्यास करत हा चित्रपट पुढे गेला असल्याने त्याला वेळ लागला. पण चित्रपट चांगला करायचा आहे म्हटल्यावर तेवढा वेळ द्यावाच लागणार होता, असं तो स्पष्ट करतो. ‘साहो’ प्रदर्शित झाल्यावर मात्र आपण थांबणार नसल्याचं त्याने सांगितलं. यापुढे वर्षांला एक चित्रपट तरी करायचाच असा संकल्प आपण केला असल्याचंही तो सांगतो.

‘साहो’चं चित्रीकरण हे सगळ्यात जास्त थकवणारं होतं, असं प्रभास म्हणतो. या चित्रपटाच्या वेळी जास्त ताण अनुभवला, पण हा ताण कथेचा किंवा दिग्दर्शकाचा नाही. तो मुळात या चित्रपटाने आलेला नाही. तर राजामौलींनी कलाकार म्हणून जी ओळख मिळवून दिली, लोकप्रियता मिळवून दिली. त्यातून आलेला हा ताण असल्याचं तो हसत हसत सांगतो. हा ताण नेमका कसा आहे, याबद्दलही तो सविस्तर सांगतो. मी तेलुगूमध्ये इतकी र्वष काम केलेलं आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून मला देशभरात आणि जगातही काही काही लोक ओळखत होते. याआधी मी कित्येकदा मुंबईत येऊन गेलो आहे. तेव्हा मला इथे फारसं क ोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे तेलुगू अभिनेता म्हणून माझा सगळीकडे अगदी सहज वावर होता. आता जगभरात खूप लोक मला ओळखतात, ही एकाअर्थी चांगली गोष्ट आहे पण तेवढीच घाबरवणारी गोष्ट आहे. आता मी कुठेही सहजपणे जाऊ शकत नाही. एक माणूस म्हणून माझा जो सर्वसामान्य वावर होता, फिरणं-बोलणं होतं ते सगळं बंद झालं आहे. अजूनही आपण एखादं स्वप्न बघतो आहोत, असंच मला वाटतं. ज्या रस्त्यांवर मला कोणी ओळखतही नव्हतं, तिथे पावलापावलावर तुम्हाला ओळखणारी मंडळी आहेत हे अजूनही स्वप्नवतच वाटत असल्याचं तो सांगतो.

‘साहो’च्या निमित्ताने तो बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहे. हा प्रवेश आपल्यासाठी सोपा निश्चितच नाही, असं तो म्हणतो. तेलुगू चित्रपटसृष्टी इतकी मोठी नाही, इतकं  ग्लॅमर तिथे नाही. तिथली आणि इथली संस्कृती यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचं त्याने सांगितलं. मी पहिल्यांदा ‘बाहुबली’च्या निमित्ताने हिंदीत आलो तेव्हाही इथले लोक चित्रपट अशा पद्धतीने स्वीकारतील असं मला वाटलं नव्हतं. पण चित्रपट लोकांना आवडला, इतकं च नाही तर त्यावेळीही हिंदीतील अनेक कलाकारांनी आपणहून माझी चौकशी केली. अनेकांनी मला मेसेज केले. कुठेतरी त्यांची ही आपुलकी मला अनुभवायला मिळाली. आता ‘साहो’ प्रदर्शित झाल्यावर मला हिंदीतही अभिनेता म्हणून यश मिळतं आहे की नाही, हे लक्षात येईल, असं तो म्हणतो. सध्या तरी त्याचे लक्ष म्हणूनच या चित्रपटावर केंद्रित झाले आहे. ‘साहो’ला प्रेक्षकांनी स्वीकारलं तर मी हिंदीतच नाही देशभरातील विविध भाषांत चित्रपट करेन, असंही त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे केवळ त्याचे चाहतेच नाही तर त्यालाही आपला हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट तिकीटबारीवर काय करणार, याची उत्सुकताही लागली आहे आणि दडपणही आलं आहे. या चित्रपटानंतर मात्र आपण एक प्रेमपट करणार आहोत असंही त्याने स्पष्ट केलं. एकूणच मेहनतीने का होईना अचानक आलेलं एवढं यशही पचवणं तितकं सोपं नसतं हे प्रभासच्या बोलण्यावरून सतत जाणवत राहतं.

मी तेलुगूत दोन यशस्वी चित्रपट केले तर काही फ्लॉप चित्रपटही दिले आहेत. समोर बसलेल्या प्रेक्षकांना कोणत्या वेळी काय पाहायला आवडेल, याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. त्यांना ‘बाहुबली’ आवडतो. ‘अर्जुन रेड्डी’लाही ते डोक्यावर घेतात आणि त्यांना ‘डार्लिंग’ही आवडतो. मला वाटतं प्रत्येक वेळी प्रत्येक चि\त्रपट आणि त्याचा प्रेक्षक हा वेगळाच असतो. त्यामुळे तुम्ही स्वत:ला प्रस्थापित अभिनेता म्हणवून घेऊ शकत नाही. उलट कधी कधी फ्लॉप चित्रपटांचा सामना करणं सोपं असतं असं वाटतं. आपला चित्रपट अपयशी झाला म्हणजे आपण आपल्याकडे जे होतं ते गमावून बसलो आहोत, हे सत्य आपल्याला जाणवतं. त्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपयशानंतर जी गोष्ट तुमच्यासमोर येईल ती तुमच्यासाठी या ना त्या अर्थाने फायदेशीरच असते. इथे मात्र राजामौलींनी मला ‘बाहुबली’ दिला आणि आता त्यानंतर जे सगळं झालं त्याचं काय करायचं हेच माझ्या लक्षात येत नाही आहे. सध्या प्रयत्नपूर्वक चांगलं काम शोधून ते करत राहणं एवढंच माझ्या हातात आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करतो आहे.      – प्रभास