ओटीटीवर चित्रपट पाहण्याची आवड असणारे प्रेक्षक अनेकदा बॉक्स ऑफिसवर यशस्वी न झालेले चित्रपट ओटीटीवर पाहणं पसंत करतात. कारण तिकिटांवर भरमसाठ खर्च करावा लागत नाही, त्याचबरोबर ते घरबसल्या पाहता येतात. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमके का फ्लॉप झाले असतील याबाबत ते ओटीटीवर पाहून चर्चा करतात.

२०२६ मध्ये एका दाक्षिणात्य सुपरस्टारच्या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये खूप क्रेझ होती. चित्रपटाचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं. म्युझिक लाँच व प्रिमियरला चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती, तरीही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण आता, ओटीटीवर आल्यानंतर त्याचे नशीब पालटले आहे.

चित्रपटाचं नाव काय?

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय तो आहे प्रभासचा ‘द राजा साब’. प्रभासचा ‘द राजासाब’ (The Raja Saab) हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असून तो ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. सुपरस्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेला २ तास ४० मिनिटांच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. कलाकारांची मांदियाळी असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. चित्रपट एक महिनाही थिएटरमध्ये टिकू शकला नाही. त्यामुळे थिएटर रिलीजनंतर महिन्याभरात तो निर्मात्यांनी ओटीटीवर रिलीज केला.

Award Banner

‘द राजासाब’ ६ फेब्रुवारी रोजी ओटीटीवर प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर रिलीज झाला. ‘द राजासाब’च्या निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज करताना एक मोठा निर्णय घेतला. हा चित्रपट ओटीटीवर एक्स्टेंडेड दृश्यांसह प्रदर्शित करण्यात आला. कदाचित यामुळेच या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले असेल. आता, प्रेक्षक घरबसल्या एक्स्टेंडेड दृश्ये पाहत आहेत, जी त्यांना थिएटरमध्ये पाहायला मिळाली नव्हती. महत्त्वाचं म्हणजे, हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर, हा चित्रपट ओटीटीवर हिट होण्याची शक्यता दिसतेय.

द राजासाबचे बजेट, कलेक्शन व स्टारकास्ट

‘द राजासाब’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आला असून त्याचे बजेट अंदाजे ४०० ते ४५० कोटी इतके आहे. यामध्ये व्हीएफएक्स (VFX), भव्य सेट्स आणि प्रभासचे मानधन यावर मोठा खर्च करण्यात आला. या चित्रपटाने जगभरात २०८.३९ कोटी रुपये कमावले. प्रभासबरोबर मालविका मोहनन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार, संजय दत्त, बोमन इराणी, ब्रह्मानंदन व जरीना वहाब यांच्या भूमिका आहेत.