Prabhu Deva Directorial Debut : प्रभू देवा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत त्याचं मोठं नाव आहेच; पण बॉलीवूडमध्येही त्यानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकांना तो फक्त नर्तक म्हणून परिचित असेल; पण प्रभू देवा एक चांगला चित्रपट दिग्दर्शकसुद्धा आहे.

प्रभू देवानं आतापर्यंत अनेक चांगले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का त्यानं पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या चित्रपटाचे तब्बल नऊ रिमेक बनले होते. तर, त्याचं दिग्दर्शन असलेले इतर अनेक चित्रपटसुद्धा हिट झाले आहेत. याच दाक्षिणात्य चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिनं तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केेलेलं. हा चित्रपट कोणता आहे आणि याचे कोणत्या भाषेत रिमेक बनले आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

चित्रपटाचं नाव काय?

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार २१ वर्षांपूर्वी प्रभू देवानं एका चित्रपटाचं दिग्दर्शन करायला नकार दिला होता. परंतु, निर्माते एम. एस. राजू यांनी त्याची समजू,त काढली आणि त्याला पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या मागे काम करायला लावलं. चित्रपटाचं बजेट होतं १० कोटी. नायक एक तरुण अभिनेता होता, ज्यानं फक्त एकाच चित्रपटात काम केलेलं आणि नायिका तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती. या चित्रपटाचं नाव आहे ‘नुव्वोस्तानंते नेनोड्डंताना’.

Award Banner

‘नुव्वोस्तानंते नेनोड्डंताना’ या चित्रपटाचे तब्बल नऊ रिमेक बनले होते. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक रिमेक बनलेला रेकॉर्ड या चित्रपटाच्या नावे झाला. एम. एस. राजू यांनीच या चित्रटाची पटकथा लिहिली होती. त्यांनीच चित्रपटाच्या नायकाची सिद्धार्थची त्याच्या ‘बॉयज’ चित्रपटातील काम पाहिल्यानंतर निवड केली होती. कारण- त्यांना नवीन चेहराच हवा होता.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटामध्ये संतोष नावाचा एनआरआय मुलगा असतो, जो लंडनमध्ये लहानाचा मोठा झालेला असतो. जो एका नातेवाइकाच्या लग्नात खेडेगावातील सिरी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. परंतु, तिचे काका, ज्यांची भूमिका श्रीहरी यांनी साकारलेली त्यांनी संतोषला गावी ये, शेतात पीक उगवून दाखव आणि पैसे कमवून स्वत:ला सिद्ध कर, असं आवाहन दिलं होतं. या प्रवासादरम्यान चित्रपटाची कथा अजून रंजक होते. तर, चित्रपटातील सिद्धार्थ व त्रिशा यांची केमिस्ट्रीसुद्धा लक्ष वेधून घेते.

‘नुव्वोस्तानंते नेनोड्डंताना’ हा चित्रपट १४ जानेवारी २००५ मध्ये प्रदर्शित झालेला. ५० दिवस ७९ सेंटरमध्ये आणि १०० दिवस ३५ सेंटरमध्ये हा चित्रपट चालला. २००५ मधील तेलुगू सिनेमातील सुपरहिट चित्रपट ठरला. एकही लोकप्रिय कलाकार नसताना चित्रपटाला इतकं यश मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे कथा किती महत्त्वाची असते हे पुन्हा सिद्ध झालेलं.

प्रभू देवाच्या चित्रपटाचे बनले ९ रिमेक

‘नुव्वोस्तानंते नेनोड्डंताना’ हा चित्रपट इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांपासून यासाठी वेगळा ठरतो की याचे इतर विविध भाषांतही रिमेक झाले. तमीळमध्ये या चित्रपटाचा ‘उनक्कुम् एनक्कुम्’ नावानं रिमेक बनला; तर कन्नडमध्ये ‘नीनेल्लो नानल्ले’ या नावानं बनला. बंगालीत ‘आय लव्ह यू’, मणिपुरीत ‘निंगोल थाजाबा’, ओडियामध्ये ‘सुना चढेई मो रूपा चढेई’, पंजाबीमध्ये ‘तेरा मेरा की रिश्ता’, बांगलादेशी बंगालीमध्ये ‘निश्शास आमार तुमी’, नेपाली भाषेत ‘द फ्लॅश बॅक’ व हिंदीत ‘रमैया वस्तावैया’ या नावांनी चित्रपटाचे रिमेक बनले होते. हिंदीतील रमैया वस्तावैया या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: प्रभू देवा यांनीच केलेलं; परंतु, तेव्हा हा चित्रपट फ्लॉप ठरलेला. मात्र, इतर आठ भाषांतील चित्रपट हिट ठरले होते. आता हा चित्रपट ओटीटीवर अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, सन एनएक्सटीवर पाहू शकता.