चित्रपट निर्माते सतानत धर्माच्या भावाना दुखावत असल्याचा आरोप भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलाय. भारत भक्ती आखाडाच्या प्रमुख असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापुढे चित्रपट निर्माते, वेब सिरीजच्या स्क्रीप्ट वाचण्यासाठी वेगळा विभाग स्थापन करणार असल्याची घोषणा केलीय. तसेच वादग्रस्त चित्रपट निर्मितीला परवानगी दिली जाणार नाही असंही त्या म्हणाल्यात. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आश्रम या वेब सिरीजच्या तिसऱ्या पर्वाचं चित्रकरण थांबवण्याची धमकीही दिलीय. विशेष म्हणजे बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आश्रमच्या चित्रिकरण स्थळावर धुडगूस घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय.

भोपाळमधील आश्रमच्या सेटवर करण्यात आलेल्या हल्ल्यात दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकण्यात आली. हिंदूना नकारात्मक भूमिकेत दाखवलं जात असल्याचा आरोप हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केलीय. मनोरंजन श्रेत्राने समाजाला योग्य दिशेने नेलं पाहिजे. या क्षेत्राने लोकांच्या भावना दुखावता कामा नये, असंही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

“ते (चित्रपट निर्माते) आम्हाला त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी भाग पाडत असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याला प्रवृत्त करत आहेत. सतानत धर्माशी कोणीही छेडछाड केल्यास आम्ही ते सहन करणार नाही,” असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. भोपाळमधील आश्रमच्या सेटवरील हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपलं म्हणणं मांडलं.

आपण स्वत: चित्रपट पाहत नाही पण भारत भक्ती अखाडा (स्थापना फेब्रुवारी २०१९ साली) अंतर्गत वेगळा विभाग केला जाणार आहे. या विभागांकडून चित्रपट, वेब सिरीजच्या स्क्रीप्टची पहाणी केली जाईल असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. “आम्ही अशाप्रकारचे चित्रपट निर्माण होऊ देणार नाही. मी स्वत: अशा लोकांविरोधात सेन्सर बोर्डमध्ये कारवाई करणार आहे,” असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना यासंदर्भात आपण पत्र लिहिलं असून अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीय असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला.भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. ‘आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन हैदोस घातला. त्यांनी चित्रीकरणस्थळी तोडमोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने या वेबसीरिजचे चित्रीकरण चालू देणार नाही, असा इशाराही दिला.