मिशेल ओबामासोबत केलेल्या डॉक्यूमेंट्रीसाठी भारतीय यूट्यूबर प्राजक्ता कोळीला मिळाला एमी अवॉर्ड

२७ वर्षीय ठाणेकर प्राजक्ता कोळीनं भारत देशाचं नाव उंचावल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ‘मोस्टली सेन’ नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे.

prajakta-kolis-documentary-with-michelle-obama-wins-daytime-emmy-award
(Photo: Instagram@mostlysane)

भारतीय यूट्यूबर आणि नेटफ्लिक्स स्टार तसंच मुळची ठाणेकर असलेल्या प्राजक्ता कोळीने जगभरात आपलं नाव झळकावलंय. गेल्या वर्षी भारतीय यूट्यूबर प्राजक्ता कोळीने अमेरिकेच्या पूर्व प्रथम महिला आणि अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत एक डॉक्यूमेंट्री तयार केली होती. प्राजक्ताच्या या डॉक्यूमेंट्रीला ४८ वा डे-टाइम एमी अवॉर्ड मिळालाय. त्यामूळे २७ वर्षीय ठाणेकर प्राजक्ता कोळीनं भारत देशाचं नाव उंचावल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

‘मोस्टली सेन’ हे नाव वाचताच वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओंच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी प्राजक्ता कोळी ही मुळची ठाणेकर आहे. ‘मोस्टली सेन’ नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे आणि जवळपास 6.22 मिलियन पेक्षा सबस्क्राइबर्स आहेत. अमेरिकेच्या पूर्व प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्यासोबत तिने यूट्यूब ओरिजनल्ससाठी गेल्या वर्षी ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ नावाची एक डॉक्यूमेंट्री तयार केली होती. या डॉक्यूमेंट्रीमध्ये व्हिएतनाम, भारत आणि नामीबिया सारख्या देशांमध्ये शिक्षण घेताना अडचणींचा सामना करूनही हार न मानणाऱ्या मुलींचा अनुभव दाखवण्यात आला होता. प्राजक्ता कोळीने घेतलेल्या या पुढाकाराबाबत तिचं देशभरातून कौतुक करण्यात आलं होतं. या डॉक्यूमेंट्रीमध्ये भारतीय-अमेरिकन यूट्यूबर लिजा कोशी आणि मुळच्या दक्षिण अफ्रिकेतील थेम्बे महलाबा सारख्या अनेक स्टार्सनी या डॉक्यूमेंट्रीत काम केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

या डॉक्यूमेंट्रीसाठी प्राजक्ताने लखनऊला जाऊन प्रेरणा फाउंडेशच्या मुलींची भेट घेतली होती. या फाउंडेशनच्या मुलींनी छोट्या शहरात राहून शिक्षणासाठी अनेक समस्यांचा सामना केलाय. या डॉक्यूमेंट्रीमध्ये लोकल हॅण्डबॉल टीममध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या १७ वर्षीय मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे.

प्राजक्ता कोळीच्या या डॉक्यूमेंट्रीला ‘आऊटस्टॅण्डींग डेटाईम नॉन फिक्शन स्पेशल’ या कॅटगरीत एमी अवॉर्ड मिळालाय. इतकंच नव्हे तर प्राजक्ता कोळीचा ‘ख्याली पुलाव’ या चित्रपट सुद्धा नुकतंच पार पडलेल्या नॉर्थ अमेरिकेचा सगळ्यात जुना इंडियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं.

प्राजक्ता कोळीबद्दल सांगायचं झालं तर तिने मुलूंडमधल्या वीजी वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या महाविद्यालयात मास मीडियामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलंय. प्राजक्ताने मुंबईतल्या १०४ रेडिओ एफएममध्ये एक वर्ष इंटर्न म्हणून काम केलंय. याच दरम्यान तिची ओळख सुपरस्टार अभिनेता ह्रतिक रोशनसोबत झाली आणि त्यावेळी त्याच्यासोबत एक व्हिडीओ तयार केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

त्यानंतर तिने १२ फेब्रूवारी २०१५ रोजी तिनं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. लोकांच्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या विषयावर ती वेगवेगळे व्हिडीओ तयार करू लागली. तिने सैफ अली खान, आयुष्यमान खुराना, काजोल, जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, आणि विक्की कौशल यांसारख्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत तिने व्हिडीओ तयार केले. २०१७ रोजी आयडब्ल्यूएस डिजीटल अवॉर्डसाठी ‘व्हायरल क्वीन’ म्हणून तिला सन्मानित करण्यात आलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prajakta kolis documentary with michelle obama wins daytime emmy award prp