‘टॅलेंट हंट शो’मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांद्वारेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या नव्या फोटोशूटची सध्या इन्स्टाग्रामवर फार चर्चा आहे.
फोटोग्राफर विक्रांतने प्राजक्ताचं हे नवीन फोटोशूट केलं असून त्यामध्ये प्राजक्ताचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. त्यातल्या एका फोटोमध्ये सध्या चर्चेत असलेला पोलका डॉट टॉप प्राजक्ताने परिधान केलेला पाहायला मिळत असून त्यावर तिचा रेट्रो लूक शोभून दिसतोय. या फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा तिने दिलंय. ‘सारी दुनिया हारी हम से..हम तुझपे दिल हारे, गहरी नैनोंवाले..लहरी लहरी नैनोंवाले..’, असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोला दिलं आहे. तर दुसऱ्या फोटोला ‘बचके रहना रे बाबा..तुझ पे नज़र है,’ या गाण्याच्या ओळी तिने कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. या ओळींप्रमाणेच प्राजक्ताची नजर या फोटोमध्ये पाहायला मिळतेय. प्राजक्ताच्या या नवीन फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ताने २०११ मध्ये ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमधून टीव्हीवरील प्रवासाची सुरुवात केली. प्राजक्ताने या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. मॉडेलिंग करत असतानाच प्राजक्ताला ललित प्रभाकरसोबत ‘जुळून येती रेशिमगाठी’ या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेतील तिची मेघनाची भूमिका अजूनही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे.
