Prajakta Mali on Lagnapanchami marathi play: ‘लग्नपंचमी’ हे नाटक सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे फक्त प्रेक्षकच नाही तर कलाकारही या नाटकाचे भरभरून कौतुक करत आहेत. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचाही समावेश झाला आहे.
प्राजक्ता माळीने केले ‘लग्नपंचमी’ नाटकाचे कौतुक
प्राजक्ता माळीने नुकतेच लग्नपंचमी हे नाटक पाहिले. हे नाटक पाहिल्यानंतर तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. तिने नाटकातील कलाकारांबरोबर फोटो शेअर करत लिहिले, “आज लग्नपंचमी हे सुंदर नाटक पाहिलं. लग्न झालेल्यांनी, लग्न करण्याची इच्छा असलेल्यांनी, लग्न न करण्याची इच्छा असलेल्यांनी, थोडक्यात सर्वांनी हे नाटक पहावं. हे नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मनोरंजन करेल हे निश्चित आहे.”
पुढे तिने मधुगंधा कुलकर्णी यांना टॅग करत लिहिले, “मधू ताई, नाटकाची लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री आहेस. या तिन्ही बाजू तू इतक्या सुंदररित्या सांभाळतेस. हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि तुझ्या विचारांच्या प्रेमात तर मी फार पूर्वीपासून आहेच. आज नाटकातून पुन्हा ते अनुभवायला मिळाले.”
स्वप्नील जोशीला टॅग करत लिहिले, “तुमचा रंगमंचावरील नैसर्गिक वावर पाहून मी थक्क झालेय. तुम्हाला स्टेजवर काम करताना पाहणे ही माझ्यासाठी पर्वणी आहे.” पुढे तिने विदुला चौगुले आणि मुकेश जाधव यांना टॅग करत त्यांचेही कौतुक केले. तिने लिहिले, “खूप सुंदर काम करत आहात.”
शेवटी तिने लिहिले, “थोडक्यात हे ३ तास फारच मजेत गेले. त्यात योगायोगाने प्रेक्षकांमध्ये माझ्याबरोबर ललित प्रभाकर आणि परेश मोकाशी होते. त्यामुळे आणखीच धमाल आली.”
थँक्यू सखी म्हणत स्वप्नील जोशीने मानले प्राजक्ता माळीचे आभार
प्राजक्ताच्या या पोस्टवर कलाकारांनी कमेंट्स करत तिचे आभार मानले आहेत. स्वप्नील जोशीने लिहिले, “थँक्यू, सखी”, मधुगंधा कुलकर्णींनी लिहिले, “प्राजू, थँक्यू. या पोस्टसाठी खूप प्रेम.” तर चाहत्यांनीदेखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “आम्हाला हा योगायोग आवडतो”, दुसऱ्या एकाने लिहिले, “सगळे आवडते कलाकार एकाच फ्रेममध्ये आहेत”, आणखी एकाने लिहिले, “सगळे टॅलेंटेड कलाकार एराच फ्रेममध्ये आहेत.”

दरम्यान, ललित व प्राजक्ता लवकरच एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सिनेमाची घोषणा केली आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ असे सिनेमाचे नाव आहे.
