आपल्याच कलाकृतीचा आपण एक भाग असावे हा मोह भल्याभल्या दिग्दर्शकांना टाळता येत नाही. याआधी शोमन सुभाष घई यांना आपल्या प्रत्येक चित्रपटात एका तरी दृश्यात डोकावून जायची सवय होती. आता प्रकाश झासारख्या दिग्दर्शकाला आपल्याच चित्रपटातून चमकायची तशी सवय नाही. पण, सत्याग्रह या चित्रपटातील एक दृश्य प्रकाश झा यांनी पूर्णपणे स्वत:वर चित्रीत केले आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचे पटकथा लेखक अंजुम राजाबाली यांनाही या दृश्यात सामील करून घेतले आहे. ‘सत्याग्रह’ची कथा प्रकाश झा यांना मनापासून भावली आहे. या चित्रपटातून त्यांना विधायक असे काही मांडायचे आहे, सुचवायचे आहे. भ्रष्टाचाराविरोधी उभ्या राहणाऱ्या चळवळी आणि त्याअनुषंगाने घडत राहणारे राजकारण, समाजकारण याचा वेध घेण्याचा प्रयत्न प्रकाश झा यांनी केला आहे. या कथेच्या माध्यमातून आत्ताच्या या राजकारणाबद्दल आणि त्याच्या समाजमनावर होणाऱ्या परिणामांबद्दलचे विचार त्यांना मांडायचे आहेत. त्यामुळे हे दृश्य स्वत:वरच चित्रीत करायचा निर्णय प्रकाश झा यांनी घेतला आणि दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या सहाय्यक दिग्दर्शकावर सोपवली. या दृश्यात त्यांनी आपले पटकथा लेखक अंजुम राजाबाली यांनाही याच उद्देशाने सामील करून घेतले आहे. लेखक म्हणून कथेत अंजुम राजाबाली यांनी या विचारांची मांडणी केली असल्याने ते हे दृश्य उत्तमपणे वठवू शकतील, असा विश्वास झा यांना वाटला.
प्रकाश झा यांनी याआधी आपल्याच ‘आरक्षण’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती. शिवाय, अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या कलाकारांकडून आपल्याला हवा तो विषय काढून घेण्याची ताकद असलेल्या प्रकाश झा यांच्यासारख्या मुरब्बी दिग्दर्शकाला अभिनय करणे अवघड नाही. तरीही या एका छोटय़ा दृश्यासाठी झा यांनी सलग चार तास सराव केला आणि आपल्याला जे हवे ते अगदी अचूक जमते हे लक्षात आल्यानंतरच त्यांनी दृश्याची तयारी केली. त्यामुळे ‘सत्याग्रह’ हा एक प्रकारे झा यांचे आजच्या राजकारणावर केलेले सणसणीत भाष्य असणार यात शंका नाही.