दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज व पोनी वर्मा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. काम करताना दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोनी पंजाबी कुटुंबातील असल्याने दक्षिण भारतीय असलेल्या प्रकाश राज यांच्याशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल मित्रमंडळी आणि कुटुंबीय साशंक होते.

रोज सांबार खाऊन मरशील

पोनी वर्मा आणि प्रकाश राज यांची भेट झाली, तेव्हा पोनी तिच्या आईच्या निधनामुळे दुःखात होती, तर प्रकाश राज पहिल्या पत्नी ललिता कुमारी यांच्यापासून घटस्फोट घेत होते. १९९४ मध्ये प्रकाश राज यांनी ललिता कुमारी यांच्याशी लग्न केलं होतं. पोनीने ‘प्रेमा’या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती, हे सांगितलं. ती म्हणाली, “त्यांना दक्षिण भारतीयांबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते मला म्हणायचे, रोज सांबार खाऊन एक दिवस मरशील.आम्ही कधीतरी हॉटेलमध्ये इडली-सांबार खातो, ते आम्हाला आवडतं. पण मी त्यांना सांगितलं की मला सांबार आवडतं. माझे मित्रही मला विचारायचे की तुझ्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या पुरुषाशी तू लग्न का करतेस? या निर्णयावरून घरात मोठा गोंधळ झाला होता.”

मात्र, प्रकाश राज यांच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असूनही या वयातील अंतराचा तिला कधीच त्रास झाला नसल्याचं पोनीने सांगितलं. ती म्हणाली, “मला वाटतं, प्रकाश यांच्यासारखाच एखादा माणूस मला समजून घेऊ शकला असता. माझं आयुष्य, मी कुठून आले आहे, माझे विचार आणि माझा संघर्ष या सगळ्याची त्यांना जाणीव आहे. मी एखाद्या लाटेसारखी सतत धावत होते, तर प्रकाश माझ्यासाठी किनाऱ्यासारखे ठरले. त्यांच्या येण्याने माझ्या आयुष्यात शांतता आली.

पोनी पुढे म्हणाली, “पूर्वी आम्ही निवांत बसून जेवण करणं, हे आमच्या आयुष्याचा भागच नव्हतं. प्रकाश मला सांगायचे की, चमचा बाजूला ठेव आणि हाताने जेव, आरामात राहा, कशाचाही विचार करू नकोस. त्यांनी मला आयुष्यात निवांतपणे जगायला शिकवलं. शांतपणे बसून जेवण केलं, तरी काही बिघडत नाही किंवा आपण आयुष्यात मागे पडत नाही, हे त्यांनी मला समजावलं. प्रकाश यांच्यासारखा आयुष्याचा अनुभव असलेला माणूसच मला समजून घेऊ शकला असता.”

प्रकाश राज यांनी १९९४ मध्ये अभिनेत्री ललिता कुमारी यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना मेघना आणि पूजा या दोन मुली आहेत. त्यांना सिद्धार्थ नावाचा मुलगाही होता. मात्र, २००४ मध्ये पतंग उडवत असताना उंचावरून पडल्यामुळे त्याला दुखापत झाली आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यानंतर २००९ मध्ये प्रकाश राज आणि ललिता कुमारी यांचा घटस्फोट झाला. पुढे २०१० मध्ये त्यांनी कोरिओग्राफर पोनी वर्मा यांच्याशी लग्न केलं. या दोघांना २०१५ मध्ये वेदांत नावाचा मुलगा झाला.