Prakash Raj Second Wife Pony Verma: अभिनेते प्रकाश राज यांची पत्नी पोनी वर्मा ही लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. पोनी ही प्रकाश यांची दुसरी पत्नी असून दोघांच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. वयातील अंतरामुळे या दोघांवर खूप टीका झाली होती, पण त्यामुळेच नातं टिकलं, असं पोनीने सांगितलं.

प्रेमाला दिलेल्या मुलाखतीत पोनी वर्मा म्हणाली, “मी माझ्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करत असल्यामुळे माझे मित्रमैत्रिणी चिडले होते. पण आमच्यात १२ वर्षांचे अंतर आहे, याचा मला आनंद आहे. कारण मला वाटतं की प्रकाश यांच्यासारखी व्यक्तीच मला, माझ्या आयुष्यातील गांभीर्य, माझी पार्श्वभूमी, विचारसरणी आणि माझा संघर्ष योग्य प्रकारे समजू शकली.”

प्रकाश राज यांच्यामुळे आयुष्यात शांतता आली- पोनी वर्मा

पनी म्हणाली, “प्रकाश यांनी माझ्या आयुष्यात एक शांतता आणली आहे. ते नेहमी म्हणतात, ‘शांत बस, जेवणाचा आनंद घे, सगळं ठीक आहे. काहीही हातातून निघून चाललेलं नाही, वेळ निघून चाललेली नाही आणि तू आयुष्यात मागे पडत नाहीयेस. सगळं काही नीट होईल.’ प्रामाणिकपणे सांगायचं तर, प्रकाश राज ज्या परिस्थितीतून गेले आहेत, तशीच व्यक्ती मला योग्य प्रकारे सांभाळू शकली असती.”

प्रकाश राज यांच्या मुलींबद्दल पोनी वर्मा म्हणाली…

प्रकाश राज यांना पहिल्या पत्नीपासून पूजा आणि मेघना या मुली आहेत. त्यांच्याबरोबरच्या पोनी म्हणाली, “पूजा आणि मेघना नेहमी घरी येतात. लग्नाच्या दिवशी त्या दोघी माझ्या समोर उभ्या होत्या. त्यांनी लग्नात आपल्या वडिलांना मेहंदी आणि हळद लावली. त्या लग्नात आमच्यासोबत होत्या. डिसेंबर महिन्यात आम्ही एकत्र असतो. आमच्यात खूप चांगलं नातं आहे.”

प्रकाश राज यांनी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला नाही – पोनी वर्मा

प्रकाश राज यांनी कधीच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला नाही, असं पोनीने सांगितलं. “मी मुंबईची असल्याने मला आकर्षित करण्यासाठी प्रकाश यांनी दिखाऊपणा केला नाही. ते अतिशय साधे आणि जसे आहेत तसेच राहिले. मला त्यांची हीच गोष्ट आवडली. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं की, मला लग्न करायचंय. मी इथे वेळ घालवण्यासाठी आलेलो नाही.”

मुंबई सोडून हैदराबादला राहण्याबद्दल पोनी वर्माची प्रतिक्रिया

पोनी वर्माला कधी वाटलं नव्हतं की ती मुंबई सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होईल. पोनी २००० सालापासून हिंदी इंडस्ट्रीत काम करत होती. “मी मुंबई सोडून दुसऱ्या ठिकाणी राहीन असा विचार मी कधीच केला नव्हता. आज मी हैदराबादमध्ये आनंदाने राहतेय आणि माझ्या या निर्णयावर खूप खूश आहे. पण आयुष्यात इतका अनपेक्षित ट्विस्ट येईल असा विचार मी कधीच केला नव्हता.”

प्रकाश राज व पोनी वर्मा यांनी २०१० साली लग्न केलं. या दोघांना वेदांत नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे. प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिता कुमारीशी १९९४ साली पहिलं लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना मेघना, पूजा व सिद्धू ही तीन अपत्ये झाली. पण त्यांचा मुलगा सिद्धूचं १० वर्षांचा असताना निधन झालं. त्यानंतर प्रकाश व ललिता यांच्या नात्यात कटुता आली आणि ते वेगळे झाले.