‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणामुळे काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याने नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. वादानंतरच्या पहिल्याच लाइव्ह शोमधील एका व्हिडीओमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधताना प्रणित मोरे भावुक झाल्याचं दिसून आलं. १४ जून रोजी जॉर्जियामध्ये झालेल्या त्याच्या शोमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे.
यावेळी प्रणित मोरेने वादानंतरही त्याला स्वीकारल्याबद्दल आणि कायम साथ दिल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. त्याने प्रेक्षक त्याला स्वीकारतील की नाही याबद्दल त्याला खात्री नव्हती आणि त्याच्या आईने या प्रकरणानंतर त्याला दिलेला सल्ला याबद्दल सांगितलं आहे. प्रणित मोरे नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊया…
प्रणित मोरे झाला भावुक
प्रेक्षकांशी हिंदीत संवाद साधताना प्रणित मोरे म्हणाला, “मी स्टेजवर येताना एकच विचार करत होतो की, हे लोक मला स्वीकारतील का? पण जे काही घडलं त्यानंतरही तुम्ही मला इतका पाठिंबा दिला, त्यामुळे मला खूप छान वाटलं. तुमचे मनापासून आभार.” त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी “वी लव्ह यू” असं म्हणत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर प्रणित म्हणाला, “या काळात खूप काही घडलं. मी स्टँड-अप कॉमेडी पैसे कमवण्यासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी सुरू केली नव्हती. मी जी नोकरी करत होतो, त्यानंतर आनंद मिळावा म्हणून या क्षेत्रात आलो. माझा उद्देश लोकांनाही हसवणं आणि आनंद देणं हाच होता. पण जेव्हा तसं घडत नाही, तेव्हा वाईट वाटतं”.
प्रणितला त्याच्या आईने दिलेला सल्ला
या संपूर्ण प्रकरणानंतर त्याच्या आईने दिलेल्या सलल्याबद्दल सांगताना प्रणित म्हणाला, “माझ्या आईने मला फक्त एकच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, तुझ्याकडून चूक झाली आणि तू त्याबद्दल माफीही मागितली आहेस. आता तुझ्यातील बदल, तुझं वागणं ते सिद्ध करेल. त्यावर मी विचारलं, तरीही लोकांनी मला स्वीकारलं नाही तर? त्यावर आई म्हणाली, प्रत्येकाकडून चुका होतात. इथे असा कोण आहे ज्याच्याकडून कधीच चूक झालेली नाही? त्यामुळे, मी अशी चूक पुन्हा करणार नाही. मला दुसरी संधी दिल्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार. मी अनेक शो केले आहेत, पण हा शो आणि तुम्ही सर्वजण माझ्या कायम लक्षात राहाल.”
This Clip Is from his Georgia Show (14th June)#PranitMore pic.twitter.com/NtTHGUhkB0
— Supreme (@DarshanShi67146) July 30, 2026
जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रणित मोरेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याच्या एका स्टँड-अप शोमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद चिघळला. या व्हिडीओमध्ये एकाने एखाद्या महिलेवर पैसे खर्च केल्यामुळे तिच्याकडून शारीरिक संबंधांची अपेक्षा असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर प्रणित मोरेने दिलेल्या प्रतिक्रियेवरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
