गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर प्रचंड वादळ निर्माण करणाऱ्या ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणावर अखेर पडदा टाकण्यासाठी प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सज्ज झाला आहे. नेटिझन्सचा प्रचंड संताप, सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आणि करिअरवर निर्माण झालेली टांगती तलवार… या सर्व कठीण प्रसंगांतून जात असताना, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करत प्रणित पुन्हा एकदा रंगमंचावर कमबॅक करत आहे. आपल्या या वादळी प्रवासावर आधारित ‘घायल’ या नव्या शोची घोषणा त्याने केली आहे.
पोस्टर रिलीज करत लिहिली भावुक पोस्ट
प्रणितने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘घायल’ शोचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये त्याच्याभोवती काही अस्पष्ट चेहरे फिरताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांत त्याच्या आयुष्यात आलेल्या वादाचे आणि गदारोळाचे हे प्रतीक मानले जात आहे.
पोस्टर शेअर करत प्रणितने लिहिले, “भूतकाळात जे घडले ते मी बदलू शकत नाही, पण त्या घटनेमुळे मी भविष्यात कसा माणूस बनतो हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. ‘घायल’ ही याच प्रवासाची गोष्ट आहे. सुरुवात आपल्या लाडक्या मुंबईतून…”
‘लोकांनी मला स्वीकारले याचे समाधान’: लाइव्ह शोदरम्यान प्रणित भावुक
वाद शांत झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रणितने एका लाइव्ह शोदरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. स्टेजवर पुनरागमन करतानाचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो प्रेक्षकांचे आभार मानताना भावुक झालेला दिसतो.
प्रणित म्हणाला, “जेव्हा मी स्टेजवर आलो, तेव्हा मनात एकच भीती होती— लोक मला स्वीकारतील का? पण सर्व काही घडल्यानंतरही तुम्ही मला इतका पाठिंबा दिला, हे पाहून खूप बरे वाटले. तुमचे मनापासून आभार.” त्याच्या या प्रामाणिक कबुलीवर प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात ‘वी लव्ह यू’च्या घोषणा देत त्याला पाठिंबा दर्शवला.
आपल्या स्टँड-अप प्रवासाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. मी केवळ पैसे कमावण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कॉमेडी क्षेत्रात आलो नव्हतो. कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर मला ज्या गोष्टीमुळे मनापासून आनंद मिळायचा, ती गोष्ट म्हणजे स्टँड-अप कॉमेडी. लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हाच माझा हेतू होता. त्यामुळे जेव्हा माझ्याकडून तसे घडले नाही, तेव्हा मनाला खूप वेदना झाल्या.”
“चूक प्रत्येकाकडून होते…” आईच्या सल्ल्याने दाखवली योग्य वाट
या कठीण काळात आईने दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगताना प्रणित म्हणाला, “माझ्या आईने मला फक्त एकच गोष्ट सांगितली, ‘तू चूक केलीस आणि त्याची माफीही मागितलीस. आता तुझे वर्तनच तुझा खरा स्वभाव दाखवेल.’ मी आईला विचारले, ‘पण तरीही लोकांनी मला माफ केले नाही तर?’ यावर आई म्हणाली, ‘जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्याकडून कधीच चूक झाली नाही.’ त्यामुळे भावांनो, मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. मला दुसरी संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.”
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया: पाठिंब्यासोबतच ट्रोलिंगही…
प्रणितच्या या कमबॅक पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिला आहे आणि नव्या शोसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भाई कमबॅक’, ‘या कमबॅकची आम्ही वाट पाहत होतो’, ‘खूप शुभेच्छा, तू नक्कीच चांगलं करशील’ अशा सकारात्मक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीनेही प्रणितला पाठिंबा दिला आहे.
मात्र, दुसरीकडे काही युजर्सनी त्याला ट्रोल करणे सुरूच ठेवले आहे. ‘इमोशनल कार्ड खेळतोय’, ‘शोच्या तिकीटाची किंमत ३७० रुपये ठेवा’, ‘घायाळच राहा आणखी काही दिवस’, ‘तू हे क्षेत्रच सोडलं पाहिजे’, ‘असं कमबॅक जे कोणालाच नकोय’ अशा कडक शब्दांत काही युजर्सनी त्याच्यावर निशाना साधला आहे.
नेमका काय होता ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’चा वाद?
जून महिन्याच्या सुरुवातीला प्रणित मोरेच्या एका ‘क्राऊड-वर्क’ शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांपैकी एका मुलाने आपल्या डेटिंगचा अनुभव सांगताना म्हटले होते की, त्याने एका मुलीवर ३७० रुपये खर्च करून चिकन बिर्याणी खाऊ घातली होती आणि त्यानंतर तिने शारीरिक संबंध ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
या आक्षेपार्ह वक्तव्याला रोखण्याऐवजी प्रणितने त्यावर अधिक विनोदनिर्मिती केली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महिलांचा अनादर करणाऱ्या वक्तव्याला खतपाणी घातल्याचा ठपका प्रणितवर ठेवण्यात आला होता.
प्रणितने मागितली होती जाहीर माफी
वाढत्या विरोधानंतर प्रणित मोरेने एक विशेष व्हिडीओ जारी करून लोकांची जाहीर माफी मागितली होती. तो म्हणाला होता, “माझे इन्स्टाग्राम अकाउंट निलंबित असल्यामुळे मला लगेच बोलता आले नाही. माझ्या क्राऊड-वर्क व्हिडीओवर जी टीका होत आहे, ती पूर्णपणे योग्य आहे. शोदरम्यान माझ्याकडून अत्यंत आक्षेपार्ह चूक झाली. लोक हसत होते आणि त्या प्रवाहात मी वाहत गेलो.”
तो पुढे म्हणाला, “मी ती गोष्ट तिथेच थांबवू शकलो असतो किंवा त्यावर ठाम भूमिका घेऊ शकलो असतो. पण मी तसे न करता त्या चुकीच्या गोष्टीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ही माझी मोठी चूक होती.”
रेडिओ जॉकी ते डिजिटल स्टार!
‘बिग बॉस’मधील सहभागामुळे प्रणित मोरे घराघरांत पोहोचला होता. डिजिटल विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी त्याने अनेक वर्षे रेडिओ जॉकी (RJ) म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्याने स्टँड-अप कॉमेडी आणि डिजिटल कन्टेन्ट क्रिएशनच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता ‘घायल’ या नव्या शोच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
