Pranit More Comedy Show : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये एका तरुणाने महिलांबाबत अश्लील वक्तव्य केल्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. प्रणितच्या शोमध्ये सहभागी झालेला हिमांशु जांग्रा स्वत:च्या डेटिंगचा अनुभव सांगत होता. मात्र, यादरम्यान हिमांशूने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. “बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलंय, मग ते पैसे वसूल नको का करायला?” म्हणजेच बिर्याणीच्या पैशांच्या बदल्यात तो महिलेकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा करत होता. ३७० रुपये ‘वसूल’ करायचे होते असं विधान हिमांशूने यावेळी केलं. या सगळ्या प्रकरणानंतर आणि हिंमाशूच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.

‘३७० रुपयांची बिर्याणी’…सविस्तर प्रकरण जाणून घ्या…

वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेबरोबर लैंगिक संबंध ठेवणं ही माझी ‘फँटसी’ होती, असं लाइव्ह कार्यक्रमात २३ वर्षीय हिमांशूने अत्यंत आक्षेपार्ह भाषेत सांगितलं. यानंतर त्याने डेटचा किस्साही अतिशय अश्लीलपणे सांगितला. हिमांशूने दावा केला की, तो हरियाणातील गुरुग्राममध्ये एका महिलेला भेटायला गेला. हे दोघंही डेटवर गेले, ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली पण, नंतर त्याला हे पैसे ‘वसूल’ करायचे होते. ज्याचा अर्थ बदल्यात लैंगिक संबंधांची अपेक्षा करणं असा होतो. यावेळी त्याने महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि पुढे लाइव्ह शोमध्ये तो या सगळ्याचं अश्लील वर्णन करू लागला.

हा तरुण हे सगळं बोलत असताना, त्याला कोणीही विरोध केला नाही, आणि यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, त्याचं हे अश्लील बोलणं सुरू असताना प्रेक्षकही हसत होते. प्रणित मोरेही त्याला प्रतिसाद देत होता असं व्हायरल क्लिप्समध्ये पाहायला मिळत आहे. एकंदर हिमांशूला कोणीही विरोध केला नाही. हा शो २५ आणि २६ मे रोजी गुरुग्राममध्ये सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्रणित मोरेच्या शोमधील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हिमांशूसह प्रणितला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. यानंतर प्रणितला जाहीर माफी मागावी लागली. सध्या प्रणितने त्याचं मुख्य ‘आरजे प्रणित’ इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे. लाइव्ह शोदरम्यान हिमांशूच्या वक्तव्यावर “पीक गुडगाव कंटेंट” म्हणणारा प्रणित ट्रोलिंगनंतर ही मते हिमांशूची स्वत:ची आहेत आणि तेव्हा मला आक्षेप घ्यायला हवा होता असं म्हणाला.

प्रणित मोरे याबाबत म्हणाला, “प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या त्या व्यक्तीने केलेली विधानं ही माझी वैयक्तिक मतं नाहीत. तिथे हसण्याऐवजी मी आक्षेप घ्यायला हवा होता. माझ्याकडून ही चूक झाली…लाइव्ह कार्यक्रमांमध्ये तात्काळ प्रतिक्रिया द्यावी लागते पण, यामुळे माझी चूक झाकली जाणार नाही. मी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतो आणि भविष्यात अशा प्रसंगी मी अधिक विचारपूर्वक वागेन.”

दरम्यान, ‘३७० रुपयांची बिर्याणी’ हा वाद वाढल्यावर हिमांशूने देखील सोशल मीडियावर माफी मागून त्याचं अकाऊंट बंद केल्याची माहिती समोर आली आहे. यासह त्याला नोकरीवरून देखील काढून टाकण्यात आलं आहे. त्याच्या कंपनीच्या संस्थापकांनी व्हिडीओ शेअर करत त्याची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.