मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने २००९ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत तिला महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. परंतु, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी प्रार्थना बेहेरे टीव्ही रिपोर्टर होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रार्थनाने पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी तिने अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. याचदरम्यान, प्रार्थनाने बॉलीवूडचे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या एका पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली होती. यावेळी प्रार्थनाने ‘बिग बीं’ना एक वादग्रस्त प्रश्न विचारला होता. याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
प्रार्थना बेहेरे ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना म्हणाली, “अमिताभ बच्चन यांच्या ‘नि:शब्द’ सिनेमासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याठिकाणी इंडस्ट्रीतले असंख्य पत्रकार आले होते. ‘नि:शब्द’ सिनेमाची कथा अशी होती की, एक साठ वर्षांचा माणूस सोळा वर्षांच्या मुलीवर प्रेम करतो. त्यावेळी अमितजी खूप वेळा असं म्हणत होते की, अर्ध आयुष्य जगून घेतलेला व्यक्ती १६ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडतोय वगैरे…त्यानंतर मग काही वेळाने आयोजकांनी सांगितलं तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा.”
“आता मी तेव्हा अगदीच कॉलेजमध्ये वगैरे जाणारी मुलगी होते. आपण त्या वयात एका वेगळ्याच झोनमध्ये असतो…मी म्हणजे जग जिंकणार वगैरे…तर, त्याच आत्मविश्वासाने मी हात वर केला आणि विचारलं, “लोग कहते है साठ साल के बाद इंसान सठिया जाता है, तो क्या सठिया जाने के वजह से आपने १६ साल की लडकी के साथ प्यार किया इस फिल्म मै?” आता हा प्रश्न विचारताना मी ‘इस फिल्म मै’ असं बोलले होते. पण, तेव्हा अमितजी सुद्धा साठ वर्षांचे झाले होते आणि नेमकं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं सुरू होतं. त्यामुळे झालं असं की, खूप लोकांनी माझ्या प्रश्नाकडे असं पाहिलं की, मी अमितजींना तसं बोलले” पण, तसं वैयक्तिक दृष्टीकोनातून काहीच नव्हतं, असं प्रार्थनाने नमूद केलं आहे.
“माझ्या प्रश्नावर अमितजींनी उत्तर दिलं होतं, “तुम्ही चित्रपट पाहा तुम्हाला कळेल.” माझा हा प्रश्न खूपच बिनधास्त होता. एका नामांकित न्यूज कंपनीचे हेड होते त्यांना हा प्रश्न आवडला आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं. पण, तो खूप वादग्रस्त प्रश्न होता. त्यानंतरही मी अनेक वादग्रस्त प्रश्न विचारले आहेत.” असं प्रार्थना बेहेरेने सांगितलं.
दरम्यान, प्रार्थना बेहेरे ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेनंतर पूर्णवेळ अभिनय क्षेत्राकडे वळली. यानंतर तिने अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं. २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. यानंतर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे.
