Manjiri Oak Talks About Daughter In Law : अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक नेहमी तिची मतं आणि प्रतिक्रिया ठामपणे मांडत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. नवऱ्याबरोबरचे अनेक फोटो व रील व्हिडीओ ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी प्रसाद व मंजिरी यांच्या मुलाचा सार्थकचा साखरपुडा झाला. अशातच आता मंजिरीने तिच्या होणाऱ्या सुनेबद्दल सांगितलं आहे.

मंजिरी ओकने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलाच्या साखरपुड्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिची होणारी सून रितू अमराठी असल्याचं म्हटलं. तिने सुनेबरोबरच्या नात्याबद्दल आणि साखरपुड्यात सुनेला तिची आई ओरडली होती याबद्दल सांगितलं आहे. मंजिरी ओक होणाऱ्या सुनेबद्दल नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…

मंजिरी ओकने सांगितला किस्सा

प्रसाद व मंजिरी यांना सार्थक आणि मयंक अशी दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा सार्थक जर्मनीत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा पार पडला. अशातच आता ‘अभिजात मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मंजिरीने साखरपुड्यातील एक किस्सा सांगितला आहे. मंजिरी  म्हणाली, “आपल्याकडे सासू आणि सून या नात्याबद्दल खूप बोललं जातं. साखरपुड्याच्या दिवशी ती(होणारी सून) माझ्याकडे आली आणि म्हणाली की काकू लोक मला विचारत आहेत की हिच तुझी सासू आहे का? त्यावर तिची आई तिला ओरडली काकू काय म्हणतेस आई म्हण. तेव्हा मी त्यांना सांगितलं की ऐका ना आई एकच असते. जी जन्म देते तिच आई असते. तिने मला आई म्हणावं यासाठी अट्टाहास करू नका आणि ते मलाही नकोय. आई म्हणायचं आणि मनात आईसारखी भावना नसेल त्यापेक्षा आई नको म्हणू आणि मनात आईसारखी भावना ठेव.”

होणाऱ्या सुनेबद्दल मंजिरी पुढे म्हणाली, “मी तिला पहिल्या दिवशी सांगितलं की मी काही परिपूर्ण स्त्री नाही. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. असं धरुनच चालू नकोस की तुझंच चुकेल. माझ्याकडूनही चूक होऊ शकते. मी आतापर्यंत २५-३० वर्षे एकटीने संसार करत आहे. त्यामुळे माझं घर, माझं स्वयंपाकघर असं आहेच माझं. पण, म्हणून असं माझं म्हणणं नाहीये की तू काहीच बदलू नकोस. हळूहळू जाऊयात. तुला माझ्याशी काही बोलावसं वाटलं तर बिनदास्त बोलूयात. आपण त्याबद्दल चर्चा करुन मार्ग काढू.”

सुनेबद्दल मंजिरी पुढे म्हणाली, “सून मारवाडी आहे. म्हणून साखरपुडा ठरवताना मी तिच्या आईला विचारलं होतं की  तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचा आहे का साखरपुडा कारण -मला आवडणारंच होतं. पण, त्या म्हणाल्या की तुमच्याच पद्धतीने करुयात. माझं म्हणणं एवढंच आहे की संवाद ठेवला तर गोष्टी सहज सुटतात. मला संवाद साधायला आवडतं. मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना हेच सांगते की बोला.” 

प्रसाद ओकची होणारी सून कोणत्या क्षेत्रात करते काम?

मंजिरी पुढे मुलगा व सुनेबद्दल म्हणाली, “मुलानेसुद्धा आमच्यामध्ये संवाद असल्यामुळे मला लगेच येऊन सांगितलं. तेव्हा तो नुकताच कामाला लागला होता. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की हरकत नाहीये. आपण पुढे जाऊयात फक्त आता कामावर लक्ष केंद्रित कर. तीसुद्धा शिकत होती. फिजिओथेरपिस्ट आहे. मेडिकलचा अभ्यास खूप असतो. तेव्हा ती घरी यायची जायची. पण, जेव्हा तो चांगलं कमवायला लागला तेव्हा आम्ही साखरपुड्याचा विचार केला.”