अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसतेय. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा टीझर आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला ट्रेलर दोन्हींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसतेय. अशात चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रसाद ओकनं ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील फरकावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना सध्या बरंच यश मिळत आहे. मात्र तसं मराठीच्या बाबतीत फारसं होताना दिसत नाही. या परिस्थितीवर भाष्य करताना प्रसाद ओक म्हणाला, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी कोणत्याही अभिनेत्याचा चित्रपट आला तरी तिथले अभिनेते कोणतीही ईर्षा न बाळगता ते प्रमोट करताना दिसतात किंवा अल्लू अर्जुनच्या चित्रपटात दुय्यम भूमिका साकारताना फहाद फासिल सारख्या अभिनेत्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.”

आणखी वाचा- “मी आनंद दिघेंच्या गेटअपमध्ये व्हॅनिटीमधून बाहेर पडलो अन्…” प्रसाद ओकने सांगितला ‘धर्मवीर’च्या सेटवरील किस्सा

प्रसाद ओक पुढे म्हणाला, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि तिथल्या कलाकारांमध्ये एकी आहे. ते एकमेकांना धरून आहेत. ते आपल्याकडे पाहायला मिळत नाही आणि ती एकी आपल्याकडे कधीच पाहायला मिळणारही नाही. कारण आपल्याकडे एकमेकांचं भलं झालेलं पाहू शकणारी माणसंच नाहीत. मात्र दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत महेशबाबू, सूर्या, अल्लू अर्जुन यांसारखे मोठे अभिनेते एकमेकांच्या चित्रपटांचं मोठ्या आनंदानं प्रमोशन करतात.”

दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्याचा दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak reaction on south film industry and marathi film industry difference mrj
First published on: 12-05-2022 at 20:48 IST