Manjiri Oak reveals why they kept son Sarthak Oak’s engagement secret : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी थाटामाटात साखरपुडा पार पडला. प्रसाद व मंजिरी ओक यांनी लेकाच्या साखरपुड्यासाठी पारंपरिक लूक केले होते. साखरपुड्यातील त्यांचे व मुलाचे आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रसाद व मंजिरी यांना सार्थक ओक व मयंक ओक अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाने सार्थकने काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला आहे. सार्थकबद्दल बोलायचं झालं तर तो परदेशात राहतो आणि सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो असं मंजिरी ओकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी तिने त्यांना मुलाच्या साखरपुड्याबद्दल कोणाला सांगायचं नव्हतं असं म्हटलं आहे.मंजिरी मुलाच्या साखरपुड्याबद्दल काय म्हणाली सविस्तर जाणून घेऊयात…

प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक निर्माती आहे. अलीकडेच तिने ‘लाडकी विहीण योजना’ या नाटकाची निर्मिती केली. तिने यापूर्वी चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे. मंजिरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे व प्रसादचे रील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मंजिरी अनेकदा मुलाखतींमधूनसुद्धा मोकळेपणाने बोलत असते. अशातच आता तिने ‘अभिजात मराठी फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. जिथे तिने त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याबद्दल सांगितलं आहे.

मुलाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता

मुलाच्या लग्नाबद्दल मंजिरी म्हणाली, “इंडस्ट्रीतील अनेकांना मुलाचा साखरपुडा झाला याचा धक्का बसला आणि प्रेक्षकांना हे दोघेच किती लहान आहेत मग मुलाचं लहान वयात लग्न करत आहे का असा प्रश्न पडला.पण तसं नाहीये. आता मुलाचं लग्न करण्याच्या मार्गावर आहोत.” मुलाबद्दल ती पुढे म्हणाली, “मुलगा माझा आता २५ वर्षांचा आहे. तो जर्मनीला असतो. तिथेच शिकला आहे. सेटल आहे. पण, अर्थात त्याला अजून खूप काम करायचं आहे. पण, तरीही हळूहळू वाटचाल चालू आहे. आमच्यासाठीसुद्धा अचानकच ठरलं होतं. आम्हाला त्याचा गाजावाजा करायचा नव्हता. पण, आमची मैत्रीण अमृता खानविलकर हिने एक स्टोरी टाकली आणि सगळ्यांना कळलं.”

मंजिरी पुढे म्हणाली, “त्यात वाईट काहीच नाहीये. पण, माझा मोठा मुलगा जरा मीडियापासून वगैरे लांबच आहे त्यामुळे फार गाजावाज नको करुया अशी त्याची इच्छा होती. पण, ठीक आहे. आता ज्यांना कळलं त्यांचे आशिर्वाद घेऊन पुढे गेलो.”