मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले अनेकदा त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दीही करतात. मात्र नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे हेच प्रेक्षक त्यांच्यावर टीका करत आहेत. अलीकडेच घडलेल्या नीट पेपरफुटी संदर्भातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. ज्यावर आता अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनीही सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करत प्रशांत दामलेंच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, जवळपास १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला. शिक्षण व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने मोठं आंदोलन केलं होतं.
या आंदोलनात देशभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांबरोबरच अनेक पालक आणि लोकप्रिय सेलिब्रिटींनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना सहन करावा लागलेला त्रास दूर व्हावा आणि या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. मात्र या सगळ्याबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी नीटचा फुलफॉर्मच माहीत नसलेले विद्यार्थीही आंदोलात सहभागी झाले होते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. अशातच आता अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनीही त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे.
प्रशांत दामले नेमकं काय म्हणाले?
एबीपी माझाशी संवाद साधताना प्रशांत दामले यांना झेन-जी, त्यांचं आंदोलन आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “तरुणांचे प्रश्न, इच्छा, मतं वेगळी असतात. ते ऐकून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यांना उत्तर देणं योग्यवेळी हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना सगळं खूप झटपट हवं असतं. तिथल्या तिथे त्यांना उत्तर हवं असतं कारण ते आपल्यापेक्षा वेगवान आहेत. मात्र काहीवेळा त्यांच्याकडे अर्धवट माहिती असते. मला असं वाटतं की ५० पैकी ४० लोकांना अर्धवट माहिती असते दहाच जण पूर्णपणे काम करणारे आणि अभ्यासपूर्ण बोलणारे असतात. मला असं वाटतं हे दहा जण कोण आहेत ते खरे असतात त्यांची मतं समजून घेऊन निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं”.
प्रशांत दामले याबद्दल पुढे म्हणाले, “हे जे अर्धवट अभ्यास करणारी मुलं आहेत ना त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. समजा नीटचा फुलफॉर्मच माहीत नसेल तर नीटच्या आंदोलनात जाऊन उपोयग काय? नीटच्या घोषणा देऊन उपयोग काय? माझा उद्देश हा आहे की जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याबद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.” याचवेळी प्रशांत यांनी नीटचा फुलफॉर्म माहीत नसेल तर आंदोलनात सहभागी होण्यात काय उपयोग आहे असं वक्तव्य केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं. गीतांजली कुलकर्णी यांनी मुकनायक मराठीचा एक व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंच्या या वक्तव्याचा विरोध केला.

गीतांजली कुलकर्णींची प्रशांत दामलेंवर टीका
गीतांजली यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये दामलेंनी बरोबरच म्हटलंय जर नीटचा फुलफॉर्म माहीत नसेल तर त्या आंदोलनात का जायचं उगाच? म्हणजे हे असं झालं ज्याचा नाट्य शास्त्राचा अभ्यास नाही. ज्याला नाट्यशास्त्र माहीत नाही त्याने नाटक बघायला नाही जायचं. त्यापेक्षा स्पष्ट सांगायचं जे सुरू आहे ते आम्हाला मान्य नाही किंवा जे सुरू आहे त्यासाठी भूमिका घेण्याची आम्हाला भीती वाटते. असं म्हटलं गेलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रशांत दामलेंच्या वक्तव्याचा विरोध केला असून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
