जेन झींचं आंदोलन नुकतंच पार पडलं. २५ जुलै २०२५ ला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेलं हे आंदोलन यशस्वी ठरलं. या आंदोलनाच्या वेळी प्रशांत दामले यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता त्यात त्यांनी भांडण न करता प्रश्न सोडवा असं म्हटलं होतं. जेन झी, तरुणाई याबाबत प्रशांत दामले यांनी त्यांची मत मांडली आहेत.

जेन झींबाबत प्रशांत दामले काय म्हणाले?

तरुणांचे प्रश्न वेगळे असतात, तरुणांची मतं वेगळी असतात ती ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्याला योग्य वेळी उत्तर देणं महत्त्वाचं आहे. तरुणांना हल्ली सगळं झटपट पाहिजे. मी तुला काहीतरी सांगितलं तू दोन दिवसांनी फोन करुन सांगशील असं काही त्यांना चालत नाही. तिथल्या तिथे उत्तर पाहिजे असतं कारण ते आपल्यापेक्षा फास्ट आहे. अनेकदा अर्धवट माहितीवरही त्यांची गाडी ते ढकलतात. मला वाटतं की ५० पैकी ४० लोक अर्धवट माहितीवर गाडी ढकलतात. बाकी १० जण हे माहिती घेऊन आणि अभ्यास करुन बोलणारे असतात. मला असं वाटतं की १० जण कोण ते सगळ्यांनीच ओळखून घेतलं पाहिजे. जे अभ्यास करुन बोलतात ते खरे असतात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यावर निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं असं प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. माझा कट्टा एबीपी माझाच्या मुलाखत विशेष कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी जेन झींबाबत हे विधान केलं आहे.

मी तरुण असतानाचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप फरक झालाय-प्रशांत दामले

प्रशांत दामले पुढे म्हणाले, “मी जेव्हा तरुण होतो तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ हा खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मी १९७६ ला एसएससी झालो. त्यावेळी काहीच नव्हतं. इंटरनेट, टीव्ही वगैरेही नव्हते. माध्यमं म्हणजे वर्तमान पत्रं आणि रेडिओ इतकीच होती. आजच्या तरुणाईकडे माहिती मिळवण्याचे इतके स्रोत आहेत, गुगलपासून सगळेच. त्यामुळे विचार करण्यात, प्लानिंग करण्यात सगळ्यामध्ये फरक आहे. समूहाने एकत्र आलो की लवकर यश मिळतं हा एक विचारही त्यातलाच आहे. मी कॉलेजमध्ये असताना नाटक हाच विषय माझ्या पुढे होता. आजच्या तरुणांना खूप माहिती आहे. त्यांच्या इंटरेस्टची माहिती त्यांना भरपूर आहे. काही हुशार मुलांना हाताशी घेऊन काम करावं लागतं.” असं प्रशांत दामले म्हणाले.

आत्ताच्या मुलांना जास्त स्वातंत्र्य आहे असं का म्हणाले प्रशांत दामले?

घरातल्या जेन झींशी कसं जमवून घेता? असं विचारलं तेव्हा प्रशांत दामले म्हणाले मी घरात कमी बोलतो, त्यामुळे अर्धा विषय तिथेच संपतो. माझ्या मोठ्या मुलीने सांगितलं जर मला सांगितलं की हा फुल शर्ट तुला चांगला दिसत नाही, त्याच्या बाह्या फोल्ड कर. फोल्ड करायचा, त्यावर कशाला चर्चा करायची? जेव्हा महत्त्वाचे विषय असतात, अभ्यास किंवा इतर तर मग मुलीच मला सांगतात. त्यामुळे मी ते स्वीकारण्यासाठी तयार असलं पाहिजे. मला गायक व्हायचं होतं मी अभिनेता झालो. काळाच्या ओघात जिथे संधी मिळते ती घेऊन पुढे जायचं असतं. आत्ताच्या मुलांना स्वातंत्र्य खूप जास्त आहे इतकंही त्यांना नसावं असंही मला वाटतं. हे म्हणताना मी असंही म्हणेन की मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार पाहिजे तर मी असं म्हणू शकतो असंही प्रशांत दामले म्हणाले. अर्धवट अभ्यास करणाऱ्यांबाबत मी बोलतोय. नीटचा फुलफॉर्म माहीत नाही मग त्या आंदोलनात जाऊन आणि घोषणा देऊन काय उपयोग? जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती गोष्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे. १९८३ ते २००८ या कालावधीत मी फक्त कलाकार होतो. निर्मात्याला काय अडचणी येतात ते मी शिकल्यानंतर मला कळलं असंही प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे.