लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक याने आतापर्यंत ‘बावरे प्रेम हे’, ‘लग्न पाहावे करून’ आणि ‘सतरंगी रे’ हे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर तो पुन्हा एकदा ‘हॉस्टेल डेज’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

या नावाजलेल्या कलाकारांसोबतच चित्रपटात प्रतिभावान कलाकारांचा एक अख्खा चमूच काम करत आहे. चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यात समावेश आहे. चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेण्टी फोर स्टुडिओ यांनी केली असून, चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.

‘हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांची आठवण आली की कोणीही भूतकाळात रमून जातो,’ असे चित्रपटाचा दिग्दर्शक अजय नाईक म्हणाला.

१९९४ मधील साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची ही कथा आहे. १९९० च्या या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फार मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरु झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येवू लागले. समाजामध्ये त्यामुळे फार मोठे बदल झाले आणि महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले. ‘हॉस्टेल डेज’ची कथा हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदी अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते.

१९९० चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे. चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक कलाकार त्यासाठी एकत्र आले आहेत.

‘कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे,’ असे नाईक म्हणाले.