काही दिवसांपूर्वी क्रिएटिव्ह डायरेक्टर विकास गुप्ताने ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला काही काळ डेट केले असल्याचे म्हटले होते. प्रत्युषाच्या आत्महत्येच्या जवळपास पाच वर्षांनंतर विकासने हा खुलासा केला. ‘मी प्रत्युषा बॅनर्जीला डेट करत होतो आणि कित्येक वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो’ असा खुलासा विकासने केला होता. पण आता प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहने हे सर्व खोटं असल्याचे म्हटले आहे. ‘प्रत्युषाने कधीही विकासला डेट केले नाही’ असे राहुलने म्हटले आहे.

राहुलने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने प्रत्युषाने कधीही विकासला डेट केले नाही असे म्हटले आहे. ‘प्रत्युषाने कधीही विकासला डेट केले नाही. त्यामुळे त्याच्यापासून विभक्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खरं तर ते एकमेकांशी फार बोलतही नव्हते. विकासने प्रसिद्धी मिळवण्यासाठी या सर्व अफवा फसवू नयेत. आज जर प्रत्युषा आपल्यामध्ये असती तर तिने नक्कीच विकासच्या कानशिलात लगावली असती’ असे राहुल म्हणाला.

आणखी वाचा : लाइमलाइटपासून दूर असलेल्या ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत अभिनेत्रींपेक्षाही सुंदर

पुढे राहुल म्हणाला, “प्रत्युषाने कधीही तिचे खासगी आयुष्य इतरांपासून लपवून ठेवले नाही. ती नेहमी तिच्या रिलेशनशीपविषयी सर्वांसमोर बोलत असे. विकास आता अशा अफवा पसरवत आहे कारण त्याला उत्तर देण्यासाठी प्रत्युषा आपल्यामध्ये नाही. २०१५मध्ये त्यांनी ‘पॉवर कपल’ हा शो एकत्र केला होता. त्यावेळी विकासने तिला प्रपोज केले होते. पण प्रत्युषाला विकास विषयी माहिती असल्यामुळे तिने नकार दिला.”

काय म्हणाला होता विकास गुप्ता?

“इतर काही लोकांमुळे माझे आणि प्रत्युषाचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप नंतर मी तिच्यावर खूप नाराज होतो. त्यानंतर एकदा रस्त्यात आमची भेट झाली होती, त्यावेळी ती मला न पाहताच निघून गेली. मला प्रत्युषा आवडत होती. तिच्यासोबत एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायची इच्छा होती. ज्यावेळी प्रत्युषाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड राहूल राज हॉस्पिटलबाहेर चिप्स खात बसला होता. मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, त्यावळी तेथे मकरंद मल्होत्रा होता आणि तो इतर लोकांना फोन करत होता” असे विकास म्हणाला होता.

२०१६मध्ये प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला अटक करण्यात आली होती. राहुलने प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती असे म्हटले जात होते. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.