गेल्या काही दिवसांपासून अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत असणारा ‘पांडू’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषण झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटात भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेसोबत अभिनेते प्रविण तरडेंची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते.
‘पांडू’ चित्रपटात प्रविण तरडे हे एका शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र साकारणार आहेत. या चित्रपटातील ‘जाणता राजा’ हे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं गाणं नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामधून प्रविण तरडेंचा हा वेगळा लुक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.




‘पांडू’ चित्रपटातील या भूमिकेसाठी प्रविण तरडेंचा एक खास लूक तयार करण्यात आलाय. याबद्दल प्रविण तरडे म्हणतात की,“या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. आज झी स्टुडिओजने माझ्या वाढदिवशी हे गाणं आणि माझा हा लूक प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. हे गाणं, हा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.”
आणखी वाचा : ‘पतीमुळेच हिचे करिअर उद्धवस्त झाले’, तारक मेहतामधील दयाबेनच्या पतीवर संतापले नेटकरी
छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणाऱ्या ‘जाणता राजा’ या गाण्याचे गीतकार आहेत समीर सामंत तर ते संगीतबद्ध केलंय महाराष्ट्राचा लोकप्रिय संगीतकार अवधूत गुप्ते यांनी. आजवर आपल्या धारदार आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आदर्श शिंदेने हे गाणं त्याच जोशात आणि ढंगात गायलं आहे.
‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडुओने केली आहे. हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.