Prem Nazir hits Guinness world record: अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत, सलमान खान, कमल हासन, राजेश खन्ना, दिलीप कुमार, ऋषी कपूर, चिरंजीवी आणि इतर काही कलाकारांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. या सगळ्यात आणखी एका कलाकाराचा समावेश होतो. ज्यांनी अनेक सिनेमांत काम केले आहे. त्यांचे बरेच सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. आता हा अभिनेता कोण, या अभिनेत्याने कारकिर्दीत किती सिनेमांत काम केले आहे, किती सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात..
अमिताभ बच्चन यांच्या नावावर ११ ब्लॉकबस्टर्ससह सुमारे ६० हिट चित्रपट
प्रेम नझीर असे या अभिनेत्याचे नाव आहे. ते मल्याळम सुपरस्टार होते. हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टसनुसार, प्रेम नझीर यांचे त्यांच्या कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपट हिट झाले. त्यामध्ये ५० ब्लॉकबस्टर सिनेमांचा समावेश आहे. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ मल्याळम चित्रपटसृष्टीवर राज्य केले. १९५० च्या सुरुवातीपासून ते १९८० च्या शेवटपर्यंत त्यांनी सिनेसृष्टीत काम केले. यादरम्यान त्यांनी सुमारे एक हजार चित्रपटांमध्ये काम केले. त्यात ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. त्यांचे एकापाठोपाठ एक सिनेमे हिट ठरले.
हिंदुस्तान टाइम्सनुसार, अमिताभ बच्चन यांच्या नावावर ११ ब्लॉकबस्टर्ससह सुमारे ६० हिट चित्रपट आहेत; तर रजनीकांत यांचे जवळपास ७० सिनेमे हिट ठरले आणि सुमारे १२ सिनेमे ब्लॉकबस्टर्स आहेत. अक्षय कुमार, शाहरुख खान व सलमान खान यांचे प्रत्येकी सुमारे ३५ ते ३८ हिट चित्रपट आहेत. त्यात सलमान खानचे १५ ब्लॉकबस्टर्स सिनेमे असल्याचे म्हटले जाते.
अमिताभ बच्चन, रजनीकांत व शाहरुख खान यांच्या नावावर असलेल्या हिट चित्रपटांची संख्या एकत्र केली, तर ती १५० इतकी होते. ही संख्या प्रेम नझीर यांच्या हिट सिनेमांपेक्षा कमी आहे.
प्रेम नझीर यांचे खरे नाव अब्दुल खादर, असे होते. १९५२ ला प्रदर्शित झालेला ‘विसाप्पिंते विली ‘(Visappinte Vili) हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्यामुळे त्यांना प्रेम नझीर हे नाव मिळाले. १९५० च्या दशकाच्या अखेरीस, नझीर सिनेसृष्टीतील मोठे स्टार झाले होते. त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या भूमिका साकारायला सुरुवात केली होती. १९६० च्या दशकात त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यामध्ये १९६७ ला प्रदर्शित झालेल्या ‘इरुट्टिन्टे आत्मवू’ (Iruttinte Atmavu) या चित्रपटात त्यांनी एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुणाची भूमिका साकारली होती. त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. तसेच, विविध चित्रपटांमध्ये भगवान राम, भगवान कृष्ण आणि अय्यप्पा यांसारख्या धार्मिक व्यक्तिरेखा साकारल्यामुळे त्यांचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
प्रेम नझीर आणि अभिनेत्री शीला यांनी सुमारे १३० चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् आहे. १९८० मध्ये प्रेम नझीर यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. जयन, सुकुमारन, शंकर, सोमन अशा नवीन कलाकारांचे वर्चस्व वाढू लागले.
दरम्यान, प्रेम नझीर हे बराच काळ आजारी होते. १६ जानेवारी १९८९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ५९ वर्षांचे होते. त्यांचे सिनेसृष्टीतील योगदान महत्त्वाचे मानले जाते.
