जेन झींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट किंवा मालिका करण्याची गरज आपल्याला अजूनही वाटलेली नाही. त्यातल्या त्यात या पिढीशी संबंधित काही विषय आपल्याकडे हाताळले गेले असले तरी अनेकदा तरुणाईचं चित्रण हे आजवरच्या एकंदरीत तरुण पिढ्यांच्या अनुभवावर आधारलेलं आणि परिणामी ठोकळेबाज असं असतं.
हिंदीमध्ये एखादी ‘मिसमॅच्ड’ सारखी वेबमालिका नव्या पिढीचं करिअर, त्यांचा लैंगिक दृष्टिकोन, सामाजिक जाणिवा या सगळ्याच्या जवळपास जाणारी असते. या पार्श्वभूमीवर झी ५वर प्रदर्शित झालेली, गौरव पत्की दिग्दर्शित ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही खरोखरच मराठीतली जेन झींच्या विश्वाभोवती फिरणारी वेबमालिका आहे आणि त्यामुळे साहिजकच आशयात आणि मांडणीतही एक ताजेपणा आहे.
कॉर्पोरेट विश्वात फुलणारी प्रेमकथा या एका ओळीत ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ची ओळख करून देता येईल. एका पार्टीत ऋषी आणि अनन्या एकमेकांना शब्दश: धडकतात. पहिल्याच भेटीत प्रेमाची गाडी वेगाने धावू लागते खरी… पण, दुसर्या दिवशी हे दोघंही एकाच ऑफिसमध्ये समोरासमोर येतात. इथे कंपनीत इंन्टर्न म्हणून श्रीगणेशा करणार्या अनन्याला पहिल्याच दिवशी ऋषीची ओळख टीम लीडर म्हणून होते. आणि त्याचवेळी कंपनीत ‘नो डेटिंग पॉलिसी’ आहे आणि ती कडकपणे राबवली जाते, हेही ठासून सांगितलं जातं.
आता खरा गोंधळ उडतो तो ऋषीचा… अनन्याने आत्ताच कामाला सुुरुवात केली आहे. करिअर वगैरे सगळ्या गोष्टी तिच्यासमोरही आहेत, पण पहिलंच प्रेम, त्यातला नवथरपणा, उत्साहाने फसफसलेला भवताल, एकंदरीत स्वप्नाळू आणि कोणालाही न जुमानणारी बेफिरीकी असं सगळं अजब मिश्रण तिच्यात आहे. तर ऋषीने मोठ्या मेहनतीने ऑफिसमध्ये स्वत:ची प्रतिमा, ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या पॉलिसी काय आहेत, हेही त्याला पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करून किंवा सारे बंधन तोडके… सगळ्यांसमोर प्रेमाचा ‘गेम ऑन’ करणं तर दूर राहिलं, त्याची सारी कुणकुणही कोणाला लागणं त्याला परवडणारं नाही. अशावेळी समोरासमोर येऊन निव्वळ दोन कर्मचार्यांप्रमाणे वावरणंही कठीण आणि प्रेमाच्या आवेगाचं गणित जुळवणं त्याहूनही अवघड.
या कॉर्पोरेट कंडिशन्समध्येही या दोघांमध्ये फुलत जाणारं प्रेम आणि त्या अनुषंगाने एकूणच त्यांची कामाची शैली, कधीही समोर येणारे टार्गेट्स, प्रोजेक्ट मिळवण्यासाठी दोन टीम्समध्ये खेळली जाणारी स्पर्धा, वरिष्ठांवर असलेलं यशाचं प्रेशर या सगळ्याची मस्त गुंफण दिग्दर्शक गौरव पत्की यांनी केली आहे.
सध्या या वेबमालिकेचे पाचच भाग प्रदर्शित झाले आहेत आणि दर आठवड्याला नवीन भाग प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट विश्वात फुलणारी ही प्रेमाची गोष्ट इतर वेबमालिकांप्रमाणे काही भागांमध्ये संपणारी नाही आणि मग सीझन एके सीझन करत वाढणारीही नाही. तर ती बर्यापैकी सलगपणे पाहायला मिळणार आहे. २० ते २५ मिनिटांच्या छोटेखानी भागातली हलकीफुलकी आणि काहीशी कुरकुरीत वाटावी अशी मांडणी हे या वेबमालिकेचं वैशिष्ट्य आहे. अनेकदा ती त्याच त्याच जागेत फिरत असल्याने मध्ये मध्ये कंटाळवाणं वाटू शकतं. मात्र, या वेबमालिकेतली अभिनेता सिध्दार्थ मेनन आणि अभिनेत्री जान्हवी उदय ही नवीकोरी मुख्य जोडी ही मोठी जमेची बाजू आहे.
दोघांच्याही व्यक्तिमत्त्वानुसार त्यांच्या व्यक्तिरेखांची मांडणी करण्यात आली आहे. एकीकडे काहीसा अबोल, संयमी, अनुभवी असा ऋषी आहे. तर दुसरीकडे बंडखोर, तितकीच लाघवी, प्रेमळ, मनात येईल ते चटकन बोलून मोकळी होणारी अनन्या. असे दोन परस्पर भिन्न स्वभाव असलेले दोघं एकत्र येतात तेव्हा साहजिकच कधी फटाके फुटतात, तर कधी प्रेमाची रिमझिम बरसात होते. अर्थात, हे सगळं जेन झींच्या जवळ जाणारं असल्याने त्यात नवेपणाही आहे आणि गंमतही आहे. सुरूवातीचे काहीच भाग प्रदर्शित झाले असल्याने पूर्णपणे वेबमालिकेचा अदमास लागणं थोडं अवघड आहे. त्यातली आत्ताची पात्रं आणि पुढच्या कथानकात आणखी काही भरीव आशयही पाहायला मिळेल, ही अपेक्षा निश्चित
आहे.
दिग्दर्शक – गौरव पत्की
कलाकार – सिद्धार्थ मेनन, जान्हवी उदय, कादंबरी कदम, मनमीत पेम, गणेश यादव, चिन्मयी सुमीत, देविका दफ्तरदार.
