जाणून घ्या, ब्रिटीश राजघराण्याच्या होणाऱ्या सूनेबद्दल

पहिल्या भेटीच्या वेळी हॅरीला तिचे नावही ठाऊक नव्हते.

prince harry weds meghan markle
प्रिन्स हॅरी, मेगन मार्कल
हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल आज (शनिवार) ब्रिटीश राजघराण्याचे धाकटे युवराज हॅरीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या साखरपुड्याचे वृत्त सर्वांसमोर उघड झाले, तेव्हापासूनच या सेलिब्रिटी जोडीविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. अनेकांनीच त्यांच्या प्रेमकहाणीविषयी, ब्रिटीश राजघराण्याच्या होणाऱ्या सूनेविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही दाखवली.

कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस इथं ४ ऑगस्ट १९८१ रोजी मेगन मार्कलचा जन्म झाला. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून तिनं थिएटरमध्ये उच्च शिक्षण घेतलं. त्यानंतर बऱ्याच टेलिव्हिजन शोमध्ये तिने भूमिका साकारली. ‘सूट्स’ या टेलिव्हिजन सीरिजमध्ये तिने साकारलेल्या रिचेल झेन या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. २०११ ते २०१७ पर्यंत तिने या सीरिजमध्ये काम केलं आणि लग्नाच्या घोषणेनंतर तिने हा शो सोडला.
मेगनचे वडील थॉमस मार्कल हे दिग्दर्शक आहेत. लहानपणी वडिलांसोबत शूटिंगसाठी सेटवर जायची आणि तेव्हापासूनच तिच्याच अभिनयाची आवड निर्माण झाली. मेगनची आई सामाजिक कार्यकर्त्या आणि योगा प्रशिक्षक आहेत. ‘सूट’मध्ये काम मिळण्यापूर्वी मेगननं अमेरिकी दूतावासमध्ये इंटर्नशिपसुद्धा केली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिनं कॅलिग्राफरची नोकरीदेखील केली.

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

२०११ मध्ये मेगनने अभिनेता ट्रेवर इंगल्सनशी लग्न केलं होतं. मात्र २०१३ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट दिला. जून २०१६ पासून ती प्रिन्स हॅरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मेगन आणि हॅरीची प्रेमकहाणी कोणा एका परिकथेप्रमाणेच आहे असे म्हणायल हरकत नाही. एका मित्राने त्या दोघांनाही ‘ब्लाइंड डेट’वरही पाठवले होते. त्यावेळी ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. किंबहुना हॅरीने मेगनचे नावही कधीच ऐकले नव्हते. मेगनलाही ब्रिटनच्या शाही कुटुंबाविषयी फार माहिती नव्हती, त्यामुळे हॅरीसोबत डेटवर जाण्यापूर्वी तीसुद्धा साशंक होती. पण, त्यानंतर मात्र या दोघांची मनं जुळली आणि एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली. अखेर आज हॅरी आणि मेगनच्या ‘रॉयल अफेयर’ला एक नवी ओळख मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prince harry weds meghan markle royal wedding know here who is meghan markle